IAS अधिकारी सांगून घातला कोटींचा गंडा; मुंबईसह दिल्लीतही गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:34 AM2023-07-22T11:34:47+5:302023-07-22T11:40:41+5:30

आयएएस अधिकारी असल्याचे भासवत फसवणूक; मुंबईसह दिल्लीतही गुन्हे

The IAS officer told the scam of crores; Crimes in Mumbai as well as in Delhi | IAS अधिकारी सांगून घातला कोटींचा गंडा; मुंबईसह दिल्लीतही गुन्हे

IAS अधिकारी सांगून घातला कोटींचा गंडा; मुंबईसह दिल्लीतही गुन्हे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेने केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय सेवा अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला. विविध प्रकल्पांत गुंतवणुकीच्या नावाखाली त्याने राजस्थानच्या व्यापाऱ्यासह अन्य गुंतवणूकदारांची पावणेसहा कोटींची फसवणूक केली. आशुतोष सहाय आणि त्याची पत्नी मोनिका हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह दिल्लीतही गुन्हे नोंद आहेत. सीबीआयनेही त्याच्यावर अटकेची कारवाई केली होती.

वर्सोवा पोलिसांनी राजस्थानमधील व्यावसायिक रामकुमार रामनारायण दाधीच (६५) यांच्या तक्रारीवरून अंधेरीतील वर्सोवा भागातील आशुतोष कुमार सहाय, मोनिका सहाय आणि मनोज पटेल, संजय पांडे विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. मनोज आणि संजय हे बिझनेस पार्टनर आणि मॅनेजर आहेत. रामकुमार यांची  शैक्षणिक संस्था आहे. रामकुमार यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांना आशुतोषने वरिष्ठ आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले.  एसआरए/म्हाडा प्रकल्पात तसेच जमीन पुनर्विकास संबंधित योजनेत गुंतवणूक केल्यास एका वर्षात दुप्पट पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यानुसार अनेकांनी गुंतवणूक केली. तसेच कांजूर, भांडुप येथील जमिनीच्या मालकीबाबत बनावट कागदपत्रे, व्हॅल्युएशन प्रमाणपत्रे आणि प्रॉमिसरी नोट अशी कागदपत्रे देऊन रामकुमार यांचा विश्वास संपादन केला. यामध्ये रामकुमार यांची दीड कोटींना फसवणूक केली, तर गुंतवणूकदाराकडून वेळोवेळी ४ कोटी २७ लाख रुपये उकळले. एकूण ५ कोटी ७७ लाख रुपयांची फसवणूक केली. त्या बदल्यात त्यांना परतावा दिला नाही. 

राज्यमंत्र्यांकडे विशेष कर्तव्य अधिकारी
सीबीआयने २०१६ मध्ये सहाय याला तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. तेव्हा तो हस्तशिल्प आणि हातमाग निर्यात महामंडळ ऑफ इंडिया लिमिटेड (वस्त्र मंत्रालय) येथे उपमहाव्यवस्थापक होता. त्यानंतर एजन्सीने त्याच्याकडून लाल दिवा असलेल्या दोन मर्सिडीज गाड्या जप्त केल्या. सहाय याने केंद्र सरकारमध्ये सहसचिव म्हणून भूमिका मांडली होती. तसेच माजी गृह राज्यमंत्र्यांकडे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून कर्तव्य बजावल्याची माहितीही सीबीआयच्या कारवाईनंतर समोर आली होती. याबाबत गुन्हे शाखा अधिक माहिती घेत आहे.

२०१८ मध्ये गुन्हे शाखेत गुन्हा
आशुतोष सहायविरुद्ध २०१८ आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा नोंद आहे. आयएएस अधिकारी असल्याचे भासवून लोखंडवाला येथील एका विकासकाची चार कोटींनी फसवणूक केली होती.

८ ते १० कंपनीचा संचालक
आशुतोष सहाय हा ८ ते १० कंपनीचा संचालक आहे. त्याने ज्येष्ठ व्यावसायिकांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. तो सध्या कुठे आहे? व काय करतोय? याबाबत आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून आम्हाला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यातील एक रुपयाही मिळाला नाही. त्याने शेकडो जणांची फसवणूक केली आहे.    -  रामकुमार रामनारायण दाधीच, तक्रारदार

दाम्पत्याकडून प्रतिसाद नाही
यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पैसे परत करण्याचा तगादा लावताच सहाय दाम्पत्याकडून प्रतिसाद आला नाही. अखेर तक्रारदारांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

 

Web Title: The IAS officer told the scam of crores; Crimes in Mumbai as well as in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.