मूर्तीची चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक, कापूरबावडी पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:37 PM2022-07-21T21:37:45+5:302022-07-21T21:38:15+5:30
ढोकाळी गाव येथील बौद्धविहारामधील चौथऱ्यावरील डॉ. आंबेडकर यांची अर्धाकृती पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची तक्रार मनोज जाधव यांनी १९ जुलैला कापूरबावडी पोलिसांत दिली होती.
ठाणे : केवळ चालण्याच्या सवयीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची चोरी करणाऱ्या सुरेश बनकर (रा. गोदावरी चाळ, गणेशनगर, मानपाडा) या सराईत चोरट्याला रंगेहाथ अटक केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याच्याकडून चोरीतील डॉ. आंबेडकर यांची अर्धाकृती पितळी मूर्तीही हस्तगत केली आहे.
ढोकाळी गाव येथील बौद्धविहारामधील चौथऱ्यावरील डॉ. आंबेडकर यांची अर्धाकृती पितळेची मूर्ती चोरीस गेल्याची तक्रार मनोज जाधव यांनी १९ जुलैला कापूरबावडी पोलिसांत दिली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे, संजय निंबाळकर आणि संदीप धांडे यांनी तक्रारदार आणि या भागातील नागरिकांना विश्वासात घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. पिंपळे यांच्या अधिपत्याखाली तीन पथके तयार केली.
घटनास्थळाच्या परिसरातील २० ठिकाणांच्या सीसीटीव्ही चित्रणांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. मूर्ती चोरीची वेळ रात्री होती. शिवाय पाऊसही जोरदार होता. त्यामुळे सीसीटीव्हीतील चित्रण स्पष्ट दिसत नव्हते. परंतु, एका सीसीटीव्ही फुटेजवरून एका संशयिताची शरीरयष्टी आणि चालण्याच्या सवयीवरून हा गुन्हा बनकर या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने केल्याचा संशय पोलिसांना बळावला. चौकशीतही हेच नाव समोर आल्याने पिंपळे यांच्या पथकाने दि. २० जुलैला मनोरमानगर भागात सकाळी सापळा लावून अटक केली. त्याने मूर्ती चोरल्याची कबुली दिल्यानंतर ही मूर्ती त्याच्याकडून हस्तगत केली आहे.