दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करणाऱ्या सराईतास चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यासह अटक
By धीरज परब | Published: May 18, 2024 05:49 PM2024-05-18T17:49:50+5:302024-05-18T17:50:46+5:30
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका मोबाईल दुकानाची भिंत तोडून आतील मोबाईल, स्मार्ट वॉच रोख असा २ लाख ६१ हजार रुपये ...
मीरारोड - भाईंदर पश्चिमेस एका मोबाईल दुकानाची भिंत तोडून आतील मोबाईल, स्मार्ट वॉच रोख असा २ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणाऱ्या सराईत चोरट्यासह चोरीचा माल विकत घेणाऱ्या दुकानदारास भाईंदर पोलिसांनी अटक केल्याची माहिती मीरा भाईंदर परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
भाईंदर पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषद वेळी उपायुक्त गायकवाड यांनी माहिती दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या सह गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, उपनिरीक्षक प्रसाद गोवले सह रवींद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, किरण पी. पवार व किरण आर. पवार, सुशील पवार, रामनाथ शिंदे, संजय चव्हाण, सलमान पटवे, जयप्रकाश जाधव यांचे पथक उपस्थित होते.
भाईंदर पश्चिमेस एक मोबाईल दुकानाची भिंत तोडून दुकानातील नवीन मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, जुने रिपेरिंगचे मोबाईल व गल्ल्यातील रोख असा २ लाख ६१ हजार ४५१ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्या प्रकरणी २७ एप्रिल रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यात एकजण संशियत आढळून आला.
त्याची छायाचित्रे विविध पोलिसांना तसेच खबऱ्यांना पाठवण्यात आली होती. तपासात तो इसम तपस ऊर्फ टायसन असल्याचे व तो मुंबईतील डेक्कन रोड फुटपाथ येथील फिरस्ता असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा रचून तपाला अटक केली असता तपस ऊर्फ टायसन जुगलचंद उरवी ( वय ४२ ) असे त्याचे खरे नाव समोर आले टायसन याला अटक केल्यावर त्याची सखोल चौकशी केली असता चोरीचे जुने मोबाईल, स्मार्ट वॉच आदी त्याने चोर बाजारात विक्रीसाठी दिले होते.
तर नवीन मोबाईल त्याने अब्दुल रहीम खलील शेख रा. मुसाफिर खाना, मस्जिद बंदर, मुंबई याला विकले होते. शेख याने ते मोबाईल पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथील त्याच्या भावाला कुरीयर ने पाठविले होते. पोलिसांनी शेख ह्याला देखील अटक केली. तसेच गुन्हयात चोरी केलेले ३५ मोबाईल , ७ स्मार्ट वॉच असा २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आता न्यायालयीन कोठडीत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले करत आहेत.