दिसली चावी, मारला स्टार्टर, पळवली पोलीस व्हॅन! मद्यपीला पकडण्यासाठी पोलिसांनी केला पाठलाग
By काशिनाथ वाघमारे | Published: July 16, 2023 09:57 PM2023-07-16T21:57:16+5:302023-07-16T21:57:36+5:30
दारूच्या नशेत केला प्रकार, कुर्डूवाडी पोलीस ठाणे येथील घटना
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: पोलिस ठाण्यासमोर लावलेली पोलिस व्हॅनच एका मद्यपीने दिसली चावी, मारला स्टार्टर अन पळवली व्हॅन. दरम्यान मद्यपीने आपली व्हॅनच पळवत असल्याचे दिसताच पोलिसांनी पाठलाग केला. पुढे जावून दोन दुचाकींना देखील धडक दिली. यानंतर लिंबाच्या बागेमध्ये नेवून मद्यपीने गाडी उलटवल्याचा प्रकार घडला.
माढा तालुक्यातील कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या समोर रविवार, १६ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महमद रफिक उस्मानबाशा शेख यांनी पोलिसांची व्हॅन (एम. एच.१३/ बी. क्यू. ०१५९) पोलिस ठाण्याच्या समोर लावली होती. पोलिस उपनिरीक्षक संदेश नाळे तपासकामी जायाचे आहे, असे सांगितले होते. यामुळे शेख हे वाहन घेवून पोलिस ठाण्यासमोर थांबले होते. पण नाळे हे पोलिस ठाण्यातून बराच वेळ बाहेर न आल्याने चालक शेख गाडीला चावी तशीच ठेऊन नाळे यांना बोलावण्याकरिता ठाणे अंमलदार कक्षासमोर जाऊन थांबले.
दरम्यान दारूच्या नशेत आलेला हमीद शेख (रा. शिंदेवस्ती, हडपसर) याने स्टार्टर मारुपन पोलिस व्हॅन माढा रस्त्यावरुन भरधाव पुढे घेवून गेला. दरम्यान अनोळखी व्यक्ती गाडी घेवून जात असल्याचे पाहून चालक शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांना सोबत घेऊन दुस-या पोलीस व्हॅनमधून पाठलाग सुरू केला. ते माढ्याच्या दिशेन पाठलाग करत गेले. पुढे जाणारा दारूच्या नशेत शेख याने दोन दुचाकींना धडक दिली. यानंतर भोसरे जवळील लिंबाच्या बागेमध्ये खड्ड्यात नेऊन वाहन उलटवले.
येथून हमीद शेख याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. बागेमध्ये उलटलेली व्हॅन क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली.
----
शुटींग करणा-यांचे मोबाईलही जप्त
लिंबाच्या बागेमध्ये गाडी उलटल्यानंतर या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. काहींनी व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी त्यांना झापत छायाचित्रण करण्यास मज्जाव केला. दरम्यान साध्या गणवेशातील काही पोलिसांनी गर्दीतील तरूणांचे मोबाईल देखील जप्त केले.