... अन् चिमुकलीने डोळे उघडण्यापूर्वीच घेतला निरोप, बोगस डॉक्टरच्या उपचाराचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 08:19 AM2022-12-20T08:19:12+5:302022-12-20T08:19:44+5:30
घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरातली मंडळी आनंदात होती. स्वागताची तयारीही झाली, पण....
मुंबई : घरात नवीन पाहुणा येणार म्हणून घरातली मंडळी आनंदात होती. तिच्या स्वागताची तयारी झाली. मात्र, बोगस डॉक्टर आणि परिचारिकेमुळे घरातील पाळण्यात चिमुकलीला खेळवण्याऐवजी तिच्या अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ शिवाजीनगर येथील कुटुंबीयांवर ओढवली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डॉक्टरसह परिचारिकेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नागपूरचा रहिवासी असलेला टॅक्सी चालक सोहेल हुसेन (२८) हे वडील, ४ भाऊ आणि पत्नीसोबत राहण्यास आहे. गेल्या वर्षी त्यांचा राबियासोबत विवाह झाला. राबिया गर्भवती असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. जुलैमध्ये राबिया शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या आईकडे राहण्यास गेली. तेथीलच आर. एन. मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मेहताब व नर्स सोलिया यांच्याकडे तपासणीसाठीजात होती. १७ तारखेला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास राबियाने मुलीला जन्म दिला. मात्र, तिची हालचाल होत नसल्याचे जाणवले, तिला रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी सोबत डॉ मेहताब व हॉस्पिटल प्रशासनाकडून बालकास ऑक्सिजन मास्क व ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नव्हती. चिमुकलीला आधी मुस्कान नंतर राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला मृत घोषित केले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी मेहताबशी संपर्क करीत रुग्णवाहिका सोबत का नाही पाठवली, याबाबत चौकशी केली. तेव्हा फोन बंद करीत डॉ. मेहताब पळून गेल्याचे स्पष्ट झाले.
नर्सिंग होमच बेकायदा ...
डॉ. मेहताब हा वैद्यकीय सेवा देण्याकरिता अधिकृत-नोंदणीकृत डॉक्टर नसल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली, तसेच नर्स सोलिया हिने नर्सिंगबाबतचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नसल्याचे समजले, डाॅ. जाकिरअली खान व त्याचा मुलगा अल्ताफ खान यांनी आर. एन. मेमोरियल हॉस्पिटलची महानगरपालिकेमधील आरोग्य विभागात नोंदणी न करता, अनधिकृतरीत्या नर्सिंग होम चालवल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी दुजोरा दिला आहे.