१४ वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 04:36 PM2023-05-02T16:36:27+5:302023-05-02T16:36:34+5:30
१५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या पांधारी शामु राजभर (२५) याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
- मंगेश कराळे
नालासोपारा : १४ वर्षापासून हत्या करून फरार असलेल्या मुख्य आरोपीला माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी मुंबईच्या अंधेरी येथून सोमवारी अटक केली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील तपास करत असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी मंगळवारी दिली आहे. १५ सप्टेंबर २०१० साली खैरपाडा येथील ताई पाटील चाळीत राहणाऱ्या पांधारी शामु राजभर (२५) याची गळा आवळून हत्या करण्यात आली होती.
आरोपीने त्याचे दोन्ही हात बांधुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकुन दिले होते. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी हत्या, हत्येचा पुरावा नष्ट करणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठांनी पोलीस ठाण्याला दाखल गुन्हयातील अभिलेखावरील पाहिजे व फरारी आरोपी यांची विशेष शोध मोहीम राबवुन त्यांच्या ठावठिकाणांबाबत माहिती घेवून त्यांना गुन्हयात अटक करण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते.
सदर सूचना व मार्गदर्शनांप्रमाणे माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांञिक विश्लेषणाद्वारे व गुप्त बातमीदारांकडुन प्राप्त माहीतीचे आधारे फरार आरोपी नामे संजय गामा भारव्दाज (३९) याला अंधेरी येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता मयत इसमाने आरोपीस ५ हजार रुपये ऍडव्हान्स न दिल्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या साथीदारांसह त्याला कारमध्ये बसवुन रुमालाने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर रुमालाने मयताचे हात पाठीमागे बांधुन त्यास मौजे ससुनवघर गावचे हद्दीत, मुंबई अहमदाबाद महामार्गावर मातीच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिले होते. तो मागील १४ वर्षापासुन बनारस, उत्तरप्रदेश व अंधेरी येथे आपले अस्तित्व लपवुन राहत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अभिजीत मडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार शैलेश पाटिल, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण व प्रविण कांदे यांनी केली आहे.