बलात्काराच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतले पेटवून
By सोमनाथ खताळ | Published: May 24, 2023 12:14 AM2023-05-24T00:14:37+5:302023-05-24T00:15:32+5:30
मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ल पेटवून घेतले.
बीड : रिक्षात विसरलेली पर्स वापस देण्याच्या बाहाण्याने विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी २०१४ ते २०२१ अशीसात वर्षे अत्याचार केला होता. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी संदीप पिंपळे याने मंगळवारी रात्री ११:३० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले, प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे
बीड येथील एका विधवा महिलेची पर्स संदीप पिंपळे याच्या रिक्षात प्रवासा दरम्यान विसरली होती. पर्स वापस देण्याच्या बहान्याने पिंपळे याने महिलेस बीडमधील कबाड गल्लीतील रूमवर बोलून घेतले व या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना २०१४ साली घडली होती. या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत ऑटोरिक्षा चालकाने तिला ब्लॅकमेल करत सतत तिच्यावर अत्याचार केला. त्याचप्रमाणे त्याचा नातेवाईक असणाऱ्या गोरख इंगोले याच्यासोबतही तिला बळजबरीने संबंध ठेवण्यास भाग पाडले. पुढे गोरख इंगोलेनेही ब्लॅकमेल करून तिच्यावर सतत अत्याचार केला. त्यानंतर २०१५ साली गोरख इंगोलेचा भाऊ बालाजी इंगोले याने देखील महिलेस ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. तर २०२० मध्ये गोरख इंगोले याने जबरदस्तीने पीडितेला दुचाकीवर बसवून जरूड ते हिवरा पहाडी रोडलगत असणाऱ्या घाटात नेले. तेथे त्याच्या ४ मित्रांकडून आळीपाळीने तब्बल ६ तास तिच्यावर अत्याचार केला. यामुळे महिला गर्भवती राहिली. गोरख इंगोले याने जबरदस्तीने गर्भपात करून घेण्यासही पीडित महिलेस भाग पाडले. हा सर्व छळ त्रास सहन न झाल्याने पीडित महिला माजलगावला आली. येथील एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करू लागली. परंतू येथेही या तिघांनी येऊन तिच्याकडे शरिर सुखाची मागणी केली. वारंवारचा मानसिक व शारिरिक त्रास सहन न झाल्याने पीडितने बीड शहर ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यावरून संदीप पिंपळे (रा.कबाडगल्ली बीड), बालाजी इंगोले, गोरख इंगोले (दोघेही आहेर धानोरा ता.बीड) यांच्यासह अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान यातील एकही आरोपी अद्याप अटक नव्हता. मंगळवारी रात्री ११:३० वाजता संदीप हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला असे म्हणत त्याने अंगावर डिझेल ओतून स्वतः ल पेटवून घेतले. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी त्याला तत्काळ बाजूला असलेल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु जास्त प्रमाणात भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.