Thane Crime: ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशी महिलेचा विनयभंग करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: August 4, 2022 10:03 PM2022-08-04T22:03:38+5:302022-08-04T22:06:16+5:30
ठाणे रेल्वे पोलिसांची कारवाई, महिलेनेही दिला चोप
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणेरेल्वे स्थानकामध्ये एका ३४ वर्षीय प्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या प्रतिक गुरव (२८, रा. रबाळे, नवी मुंबई) याला अटक केल्याची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.
एका खासगी कंपनीमध्ये काम करणारी ही प्रवासी महिला बुधवारी (३ ऑगस्ट २०२२ रोजी) सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यावरून डोंबिवलीतील घरी जाण्यास निघाली होती. ती ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर येत असताना कथित आरोपी प्रतिक याने तिचा विनयभंग केला. या प्रकारानंतर मोठया धाडसाने या महिलेने त्याला मारहाणही केली. हा प्रकार काही प्रवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला पकडून ठेवले.
त्याच दरम्यान तिथे आलेल्या गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या तसेच रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या पथकाने अटक केली.