ज्येष्ठ गायिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबविले, रहदारीच्या रस्त्यावर घडली घटना
By प्रशांत माने | Updated: February 27, 2023 16:52 IST2023-02-27T16:50:37+5:302023-02-27T16:52:24+5:30
पुर्वेकडील टिळकरोड या रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ज्येष्ठ गायिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र धूमस्टाईलने लांबविले, रहदारीच्या रस्त्यावर घडली घटना
डोंबिवली : एकट्या दुकट्या महिला गाठून त्यांच्या गळ्यातील किमती ऐवज चोरट्यांकडून धुमस्टाईलने लांबविण्याचे प्रकार सुरू असताना काल रात्री ९ च्या सुमारास येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका, संगीत समीक्षक शुभदा श्रीकांत पावगी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अशाच प्रकारे लांबविल्याची घटना घडली आहे. पुर्वेकडील टिळकरोड या रहदारीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रविवारी फडके रोड, आप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदिरात नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम संपल्यावर शुभदा या आपल्या मुलासोबत टिळक रोडवरील आपल्या घरी परतत होत्या. त्यावेळी या रस्त्यावरील ब्राम्हण सभेजवळील मेरवान केक शॉपच्या समोरून जात असताना, समोरून एक लाल रंगाची दुचाकी आली आणि त्यावर बसलेल्या दोघांपैकी एकाने शुभदा यांच्या मानेवर जोराची थाप मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसूत्र हिसकावून पलायन केले. त्यांच्या गळ्याला चोरट्यांनी ऐवज हिसकावताना फटका बसल्याने जखम झाली आहे. याप्रकरणी शुभदा यांच्या तक्रारीवरून दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
रामनगर हद्दीत चोरट्यांचा सुळसुळाट -
रामनगर हद्दीत घडणारे गुन्हे स्थानिक पोलिसांकडून उघडकीस येत असलेतरी चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी, सायकलचोरी आणि घरफोडीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोर आता रहदारीच्या रस्त्यावरही बिनदिककतपणे गुन्हे करू लागल्याने पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.