कोट्यवधीच्या फसवणूक रॅकेटमधील ‘मास्टरमाईंड’ला मुंबईतून अटक!

By योगेश पांडे | Published: January 8, 2024 10:28 PM2024-01-08T22:28:46+5:302024-01-08T22:29:08+5:30

महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक : देशभरात पसरले आहे जाळे

The 'mastermind' of the multi-crore fraud racket was arrested from Mumbai! | कोट्यवधीच्या फसवणूक रॅकेटमधील ‘मास्टरमाईंड’ला मुंबईतून अटक!

कोट्यवधीच्या फसवणूक रॅकेटमधील ‘मास्टरमाईंड’ला मुंबईतून अटक!

नागपूर : गुंतवणूकीवर ५० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची फसवणूक करणाऱ्या मुंबईतील एका टोळीच्या सूत्रधाराला नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद जवाद फारूख बोरा (३४, मीरा रोड, काशिमिरा) असे अटक करण्यात आलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. या टोळीतील एकूण चार जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

स्वाती असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना ट्रेंड प्रॉफिट फंड स्कीम ही गुंतवणुकीची योजना असल्याचे सांगत आरोपींनी जाळ्यात ओढले. गुंतवणुकीवर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले. यात दीपांकर सरकार, अमजद खान, मंदार कोलते, चंद्रशेखर रामटेके, पांडुरंग इसारकर, प्रमोद कडू, प्रदीप, सूरज डे, मंगेश पाटकर, भरत सुलेमान, अमन पांडे व राजू मंडल यांचा समावेश होता. जून २०२३ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत आरोपींनी त्यांना मंदार कोलतेच्या साईमंदिराजवळील कार्यालयात बोलावून १ कोटी रुपये घेतले. मात्र त्यांनी स्वाती यांना कुठलाही नफा दिला नाही. 

आरोपी नफा देत नसल्याने स्वाती यांनी पूर्ण रक्कम परत मागितली. यावरून आरोपी संतापले व त्यांनी स्वाती यांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर स्वाती यांनी धंतोली पोलिस ठाण्यात धाव घेतली व आरोपींविरोधात तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर सर्व आरोपींविरोधात फसवणूक व कट रचल्याचा गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तपासादरम्यान मंदार कोलते, मंगेश पाटेकर आणि सूरज डे यांना अटक केली. चौकशीनंतर मोहम्मद जवाद फारूख बोरा हा या रॅकेटचा सूत्रधार असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली.

पोलिसांनी काशिमिरा पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता तो एका हॉटेलमध्ये आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची बाब कबूल केली. त्याच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे, नोटा मोजण्याची मशीन, दोन मोबाईल, कार असा ८.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक सागर आव्हाड, संजय सोनोने, भगवान बुधवंत, राहुल ठाकूर, रविंद्र जाधव, अविक्षणी भगत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अनेकांची केली फसवणूक
मागील अनेक दिवसांपासून पोलीस मोहम्मदचा शोध घेत होते. या रॅकेटने अनेक राज्यातील लोकांची फसवणूक केली आहे. त्याच्या चौकशीत अनेक बाबी समोर येऊ शकतात. या टोळीतील काही आरोपींवर याअगोदरदेखील फसवणूकीच्या प्रकरणांत गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: The 'mastermind' of the multi-crore fraud racket was arrested from Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.