मॅकेनिक निघाला दुचाकीचोर! पाच दुचाकी जप्त; रामनगर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 08:42 PM2022-05-30T20:42:33+5:302022-05-30T20:43:30+5:30
Theft Case : गॅरेजची नोकरी सोडल्यावर त्याने दुरूस्तीच्या नावाखाली दुचाकी चोरीचे धंदे सुरू केले होते. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
डोंबिवली: एकिकडे दुचाकीचोरीचे प्रकार वाढले असताना दुसरीकडे एका दुचाकीचोराला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. राज रमेश तावडे (वय २५) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो एका गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून कामाला होता. त्यामुळे त्याला दुचाकीचे लॉक कसे खोलायचे याची माहीती होती. गॅरेजची नोकरी सोडल्यावर त्याने दुरूस्तीच्या नावाखाली दुचाकी चोरीचे धंदे सुरू केले होते. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पाश्वभूमीवर पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त जे डी मोरे आणि रामनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक गठीत केले होते. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, पोलिस नाईक प्रशांत सरनाईक यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणी सीसीटिव्ही तपासले असता एकजण दुचाकी चालवित घेऊन जात असताना दिसून आला.
डोंबिवली: एकिकडे दुचाकीचोरीचे प्रकार वाढले असताना दुसरीकडे एका दुचाकीचोराला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. pic.twitter.com/H2jlVaoZHp
— Lokmat (@lokmat) May 30, 2022
त्यात या पथकाला खबरीमार्फत मिळालेल्या माहीतीवरून तुकारामनगर, आयरेगाव, कोपर पूर्व भागात गस्त घालित असताना त्यांनी आयरेगाव परिसरात राहणारा राज रमेश तावडे हा तरूण चोरी केलेल्या एका दुचाकीसह आढळुन आला. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतू सीसीटिव्ही मधील फूटेजमध्ये राज आणि चोरी केलेली दुचाकी आढळुन आल्याने त्याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने आणखीन चार दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक सानप यांनी दिली.
लग्नात परपुरुषाशी डान्स करणं महिलेच्या जीवावर बेतलं, पतीने केली पत्नीला बेदम मारहाण
दुचाकी नादुरूस्तीचा बहाणा
राज हा ठाकुर्ली ९० फिट रोडवर एका गॅरेजमध्ये मॅकेनिक म्हणून कामाला होता. तेथून काम सोडल्यावर तो दुरूस्तीच्या बहाण्याने दुचाकी चोरी करू लागला. घरच्या मंडळींनाही तो दुरूस्तीमुळे दुचाकी आणल्याचे तो सांगायचा. विशेष बाब म्हणजे चोरी करताना तो पायी दुचाकी चालवित लोटत घेऊन जायचा, गाडी बिघडल्याचे सांगत काही वेळेला पादचा-यांचीही मदत घ्यायचा. हे त्याचे सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाले होते.