सिल्व्हर ओक हल्ल्याआधी झाली होती मीटिंग, नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू; पोलिसांची कोर्टात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 03:59 PM2022-04-11T15:59:03+5:302022-04-11T15:59:54+5:30
Gunratna Sadavarte : सिल्व्हर ओक हल्ल्याआधी मीटिंग झाली होती आणि नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.
मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना शुक्रवारी राहत्या घरातून गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी त्यांना मुंबईतील किला कोर्टात हजर करण्यात आले. सदावर्ते यांची बाजू जयश्री पाटील आणि इतर दोन वकिलांनी मांडली होती. हा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपत असून गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात झाली आहे. सिल्व्हर ओक हल्ल्याआधी मीटिंग झाली होती आणि नागपूरमधून आलेल्या कॉलबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली.
सरकारी वकील यांनी प्रदीप घरत यांनी वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली आहे. यामध्ये आणखी चार जणांच्या कोठडीची मागणी केली आहे. यामध्ये एकजण पसार असल्याचेही सांगण्यात आले आहे. सदावर्ते तपासाला सहकार्य करत नाहीत. सर्व अटक आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. यामध्ये जप्त केलेल्या काही मोबाईलमधून महत्त्वाचे पुरावे मिळाले आहे. चंद्रकांत सूर्यवंशीचा शोध सुरु आहे, असा युक्तिवाद केला. पोलिसांची कोर्टात अशी माहिती दिली की, हल्ल्याआधी एक बैठक झाली होती. या बैठकीत सिल्व्हर ओक येथे हल्ला करण्याचे ठरले होते. अभिषेक पाटील नावाचा एक एसटी कर्मचारी सदावर्ते यांच्या संपर्कात होता. त्याने फोन करुन काही पत्रकारांना बोलावले होते. युट्युब चॅनलचे देखील पत्रकार होते. नागपूरमधून आलेला कॉलबाबत चौकशी सुरु आहे.