ईडीने जप्त केलेला पैसा माझा नाही; पार्थ चॅटर्जी यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 05:33 AM2022-08-01T05:33:05+5:302022-08-01T05:33:21+5:30
निलंबित करण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शालेय भरती घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेलेे पश्चिम बंगालचे अटकेतील मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी रविवारी दावा केला की, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेला पैसा माझा नाही. माझ्याविरुद्ध कोणी कारस्थान केले, हे काळच सांगेल, असेही ते म्हणाले.
वैद्यकीय तपासणीसाठी जोकास्थित ईएसआयच्या इस्पितळात नेण्यात आले असता ते एका वाहनातून उतरल्यानंतर घोटाळ्याबाबत प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, जप्त करण्यात आलेला पैसा माझा नही. कोणी तुमच्याविरुद्ध कारस्थान करीत आहे, असे विचारले असताना चटर्जी म्हणाले की, काळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल.
चॅटर्जी यांनी शुक्रवारीही म्हटले होते, या कटकारस्थानाचा बळी आहे. निलंबित करण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला निलंबित करण्याच्या निर्णयाने निष्पक्ष चौकशी प्रभावित होऊ शकते. मला मंत्रिमंडळातून हटविण्याचा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निर्णय योग्य आहे.
गुरुवारी चॅटर्जी यांना विविध खात्यांचे प्रभारी मंत्री म्हणून कार्यमुक्त करण्यात आले असून तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. तसेच पक्षाच्या सर्व पदांवरूनही त्यांना हटविण्यात आले आहे.
त्यांच्या निकटवर्ती अर्पिता मुखर्जी यांच्या निवासस्थानातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केल्यानंतर ईडीने त्यांनाही अटक केली आहे.
तृणमूल काँग्रेस नेतृत्वाने चॅटर्जी यांच्या प्रतिक्रियेवर आक्षेप घेतला होता. तसेच पक्षाला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हाेता. ते आपल्या नियतीसाठी स्वत:च जबाबदार असल्याचे नेतृत्वाने म्हटले आहे. अटकेनंतर गेले काही दिवस ते गप्प का होते? कोर्टात जाऊन निर्दोषत्व सिद्ध करण्याचा त्यांना हक्क आहे. या घोटाळ्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी गुरुवारी म्हटले होते.