मुलगी दत्तक देण्याच्या बहाण्याने खंडणी उकळणाऱ्या आई सह दोघांना अटक तर अन्य दोघांचा शोध सुरु
By धीरज परब | Published: February 14, 2023 04:46 PM2023-02-14T16:46:10+5:302023-02-14T16:50:23+5:30
मीरारोडच्या हटकेश भागातील गौरव संकल्प फेज २ मध्ये मनीष शंकर हे त्यांची पत्नी प्रतिमा व १० आणि १३ वर्षांच्या दोन मुलांसह राहतात. दोन मुलगे असले तरी मुलीची आवड असलेल्या प्रतिमा मुलगी नसल्याने नेहमी गंभीर व तणावात असत.
मीरारोड - मुलगी दत्तक देण्याच्या बहाण्याने एका दाम्पत्याकडून २ लाख ७१ हजारांची खंडणी उकळणाऱ्या टोळीतील मुलीची आई , बोगस बाप व त्याच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपी अन्य दोघा साथीदारांचा नवघर पोलीस शोध घेत आहेत.
मीरारोडच्या हटकेश भागातील गौरव संकल्प फेज २ मध्ये मनीष शंकर हे त्यांची पत्नी प्रतिमा व १० आणि १३ वर्षांच्या दोन मुलांसह राहतात. दोन मुलगे असले तरी मुलीची आवड असलेल्या प्रतिमा मुलगी नसल्याने नेहमी गंभीर व तणावात असत.
मुलगी दत्तक घ्यायची असा त्यांनी निर्णय घेत मित्रमंडळी व बालसंस्था मध्ये चौकशी चालवली होती. मनीष यांचा मित्र चिराग मेहता याने, अल्पेश कच्छीया ह्याची मुलगी असून तो सांभाळण्यास सक्षम नसल्याचे सांगत त्याचा मोबाईल क्रमांक दिला.
मनीष याने अल्पेश शी संपर्क साधला असता , त्याने सांगितले कि मुलीची आई पळून गेली आहे व माझे खायचे वांदे असून मुलीचे पालनपोषण करू शकत नसल्याचे सांगून एक महिन्याची मुलगी त्या दाम्पत्याच्या स्वाधीन केली. मुलगी घरात आल्याने प्रतिमा व कुटुंबीय आनंदी झाले.
अल्पेश ने मुलीच्या उपचारासाठी झालेले कर्ज द्यायचे म्हणून मनीष कडून २१ हजार रुपये घेतले. मुलीच्या दत्तक प्रक्रियेचे कागदपत्रे लवकर देतो असे त्याने आश्वस्त केले. काही दिवसांनी अल्पेशने आपली मुलगी परत हवी सांगत तिला मनीष यांच्या कडून घेऊन गेला.
तीन दिवसांनी अल्पेशचा मित्र यश सोनी हा मनीषच्या गॅरेजवर आला. अल्पेश कर्जबाजारी असून अडीज लाख दिल्यास तो मुलगी देईल व पैसे देखील काही दिवसात परत करेल असे त्याने सांगितले. दत्तक प्रक्रियेसाठी मुलीच्या आईच्या कागदपत्रांची गरज असल्याचे मनीषने सांगितले असता ती कागदपत्रे सुद्धा मिळवून देण्याचे आश्वस्त केले.
त्या नंतर अल्पेश व यश सह मनिष चौधरी, रोहीत सुतार यांनी ती मुलगी मनीषच्या पुन्हा स्वाधीन करत अडीज लाख रुपये घेतले. मनीष ने दत्तक प्रक्रियेची कागदपत्रे मागितली असता लवकरच देऊ असे सांगून आणखी पैश्यांची मागणी यश आदी करू लागले. पैसे दिले नाही म्हणून मनीष यांना शिवीगाळ व धमकी देण्यात आली. अखेर मनीष यांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य पाहता वरिष्ठ निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे व प्रकाश मासाळ, सहायक निरीक्षक योगेश काळे व गणेश केकाण, उपनिरीक्षक अभिजीत लांडे व सारीका बाघचौरे सह भुषण पाटील, नवनाथ घुगे, सुरेश चव्हाण, चेतन राजपूत, सुरज घुनावत, ओंकार यादव यांच्या पथकाने तपास सुरु केला.
पोलिसांनी मोबाईल व तांत्रिक विश्लेषण वरून मुलीची आई सुधा रॉय (२४) रा. डोंबिवली सह अल्पेश कच्छीया (३३) रा. शिवसेना गल्ली व यश सोनी (२४) रा. खाऊगल्ली, भाईंदर ह्या दोघांना अटक केली आहे. तर मनीष चौधरी व रोहित सुतारचा शोध पोलीस करत आहेत.
सुधा हि आधीच्या प्रियकरा पासून गरोदर राहिली होती. नंतर अल्पेश तिच्या जीवनात आला. नालासोपारा येथे ती बाळंत झाली असता अल्पेशने मुलीचे वडील म्हणून स्वतःचे नाव दिले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.