रुग्णालयाच्या खिडकीतून मुलीला फेकून देणाऱ्या आईला तब्बल बारा वर्षांनंतर जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 07:10 PM2022-04-21T19:10:28+5:302022-04-21T19:11:20+5:30
Life Imprisonment For Murder : न्या. ए. सी. डागा यांनी सांगितले की, ती आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी आढळली आहे.
मुंबई - बारा वर्षांपूर्वी मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाला खिडकीतून फेकून देणाऱ्या दीपिका परमारला बुधवारी सकाळी ११.३० वाजता शिवडी सत्र न्यायालयाच्या पिंजऱ्यात हजर करण्यात आले. न्या. ए. सी. डागा यांनी सांगितले की, ती आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी दोषी आढळली आहे.
न्यायालयाला मराठीत संबोधित करताना परमार म्हणाली, ‘मी काहीही केलेले नाही.’ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतरही ती आपल्या मतावर ठाम राहिली. दरम्यान, परमारला ताब्यात घेताच पती मनीष याने या निकालाबाबत दु:ख व्यक्त केले. कुटुंबीय उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारी वकील रंजना बुधवंत यांनी दीपिका परमारने मुलीची हत्या केली तेव्हा ती खूपच लहान होती, असे सांगून कोर्टाकडे जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केली, तर परमारचे वकील देवेंद्र यादव यांनी कोर्टाला दया दाखवण्याची विनंती केली. सुनावणीदरम्यान बुधवंत यांनी नऊ साक्षीदार हजर केले. साक्षीदारांपैकी एक रुग्णालयातील नर्स होती. तिने न्यायालयाला सांगितले की, २६ ऑक्टोबर २०१० रोजी सकाळी ५ वाजता परमार यांनी आपली मुलगी शौचालयातून परतल्यावर बेपत्ता असल्याची तक्रार केली. यावर नर्सने लगेच इतरांना लगेच कळवले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला.
नर्स पुढे म्हणाली, 'यावेळी मला बाथरूमच्या बाहेर मुलीच्या रडण्याचा आवाज आला.' नर्सने सांगितले की, टॉयलेटच्या मागे असलेल्या आवारात मूल आढळले. एका सुरक्षा रक्षकाने तिला सांगितले की, मुलगी पाण्यात आणि चिखलात पडून आहे, त्यावेळी तिला उंदीर चावला आहे की काय असं वाटत होतं. नर्सने पुढे सांगितले की, तिने परमारला काय झाले असे विचारले असता तिने सांगितले की, ती कपडे धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती, जेव्हा ती बाथरूममधून परतली तेव्हा मुलगी बेपत्ता होती. दरम्यान, सुरक्षा रक्षकाने सांगितले की, जेव्हा त्याने मुलीला उचलले तेव्हा मुलीचे कपडे पूर्णपणे कोरडे होते.
त्यांनी परमार यांना पुन्हा विचारणा केली असता तिने नवजात मुलीला फेकून दिल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकाने कोर्टाला सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये परमार मुलीसोबत बाथरूममध्ये जाताना दिसत आहे, पण जेव्हा ती बाथरूममधून बाहेर आला तेव्हा तिचे हात रिकामे होते. मुलीचा त्याच दिवशी मृत्यू झाला.
बचाव पक्षाचा साक्षीदार, जो मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि 2010 मध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये विभागप्रमुख होता, त्याने सांगितले की, परमार 'पोस्टपार्टम डिसऑर्डर'ने ग्रस्त होती. पुढे ते म्हणाले की, प्रसूतीनंतर महिलांमध्ये हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे असा आजार होतो. बदलाबरोबर असहा घटना घडतात.
'मुलं अकाली जन्माला आली'
डॉक्टर म्हणाले, 'या घटनेनंतर तिने परमारची तपासणी केली असता ती नैराश्याने ग्रासलेली होती आणि नीट झोपत नसल्याचे आढळले. त्यांची जुळी मुले अकाली जन्माला आली. डॉक्टरांनी परमार यांना सांगितले की, ती मुलं कदाचित जास्त काळ जगू शकणार नाहीत आणि त्यांच्या मुलीची प्रकृती अधिक गंभीर आहे.