फर्निचर व्यावसायिकाची हत्या; ऑर्डर द्यायची आहे सांगत मालकाला बोलावलं अन्..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:17 AM2022-09-12T06:17:18+5:302022-09-12T06:17:32+5:30
नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूलशेजारी असलेल्या किंग्स कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहणारे शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) यांचा एकलहरा रोडवर स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे.
नाशिकरोड : येथील एकलहरा रोडवरील लाकडी फर्निचर बनविणाऱ्या स्वस्तिक कारखान्याचे संचालक व्यावसायिक शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून करून मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नाशिकरोड येथील के. जे. मेहता हायस्कूलशेजारी असलेल्या किंग्स कोर्ट अपार्टमेंटमध्ये राहणारे शिरीष गुलाबराव सोनवणे (५६) यांचा एकलहरा रोडवर स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात शालेय लाकडी बाक तयार केले जातात. शुक्रवारी (दि. ९) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास सोनवणे कारखान्यात आले होते. यानंतर एका स्वीफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्ती कारखान्यासमोर आल्या. त्यांनी कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे, असे सांगून गाडीजवळ पाठविण्यास सांगितले. मात्र, फिरोज याने त्यांना ‘आपणच कारखान्यात चला..,’ असे सांगितले असता गाडीतील व्यक्ती दिव्यांग असल्याचा संशयितांनी बनाव केला. त्यामुळे फिरोज याने मालक सोनवणे यांना कारखान्यात जाऊन तसा निरोप दिला. यानंतर सोनवणे हे बाहेर आले व गाडीत बसले. सोनवणे कुठेच सापडत नसल्याने पत्नीने तक्रार दिली होती.
सीसीटीव्हीची पाहणी; कामगारांकडे चौकशी
शनिवारी सकाळी मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील एका कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव पोलिसांना सापडला. मृतदेहावर विविध जखमाही असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वस्तिक कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे अगोदरपासूनच बंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कारखान्यामध्ये बारा कामगार कामाला असून, त्यांची प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली आहे. मात्र, कुठलाही सुगावा हाती लागला नाही.