चौदा महिन्यांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर उलगडा; वसई पोलिसांनी आरोपी पतीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:15 PM2022-09-15T18:15:18+5:302022-09-15T18:19:04+5:30
हत्या झालेल्या नातीच्या मिसिंगची तक्रार आजीने २९ ऑगस्टला आचोळा पोलीस ठाण्यात केल्यावर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
मंगेश कराळे
नालासोपारा - भुईगावच्या खाडीच्या किनारी २७ जुलै २०२१ ला सकाळच्या वेळी मुंडके नसलेला मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने वसईत खळबळ माजली होती. पण चौदा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येच्या गुन्ह्याचा अखेर वसई पोलिसांनी उलगडा केला आहे. हत्या झालेल्या नातीच्या मिसिंगची तक्रार आजीने २९ ऑगस्टला आचोळा पोलीस ठाण्यात केल्यावर या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. वसई पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.
नालासोपारा पूर्वेकडील रश्मी रेसिडन्सी येथे राहणाऱ्या आसिफ शेख (३२) आणि त्याची पत्नी सानिया (२८) यांच्यात कोणत्या ना कोणत्या घरगुती कारणावरून वाद होत होते. तसेच आरोपी पती तिच्यावर संशय घ्यायचा. शेवटी आरोपी पतीने २७ जुलै २०२१ ला गळ्यावर धारदार हत्याराने वार करत शीर धडापासून वेगळे करून ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह कोंबून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने भुईगाव खाडीत फेकून दिला होता. सदर घटनेप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्या आणि हत्याचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि या हत्येचा छडा लावण्यासाठी वसईतील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे आणि पोलीस ठाण्यातील पाच असे पोलीस अंमलदार बोलावून घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीम बेपत्ता महिलांची यादी, पोलीस ठाण्यातील मिसिंग तक्रारी याचा तपास करत होते. तसेच महाराष्ट्रातील किंवा मुंबई व आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात या वयोगटातील कोणी महिला मिसिंग आहे का याचीही माहिती घेतली होती. तसेच ज्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह मिळाला ती बॅग कुठून आणली असेल याचा तपास करत होते. अश्या बॅग कुठे बनविल्या जात आहे याचाही तपास करत होते.
हत्या झाल्यानंतर आरोपी पतीने सहा महिन्यांपूर्वी रश्मी रेसिडन्सी येथील घर विकून मुंब्रा येथे राहण्यासाठी गेला होता. २९ ऑगस्टला सानियाची आजी कमरूनिसा निपाणी यांनी आचोळे पोलीस ठाण्यात तिच्या मीसिंगची तक्रार केली होती. यानंतर गुन्ह्याच्या तपासाला वेगाने सुरुवात झाली. डी एन ए रिपोर्ट आल्यावर आरोपी पतीला मुंब्रा येथून वसई पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मयत तरुणीच्या आजीने मिसिंग तक्रार आचोळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात होती. आरोपी पती आणि हत्या झालेल्या पत्नीचा डीएनए रिपोर्ट बुधवारी आल्यावर ओळख पटली आहे. आरोपी पतीला हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वसई न्यायालयात आरोपीला हजर केल्यावर सात दिवसांची पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे.
- कल्याणराव कर्पे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे)