टोपीमुळे सापडला खूनी, मृतदेहाचे गूढ कायम; बारा तासात आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 06:43 PM2022-06-14T18:43:52+5:302022-06-14T18:44:41+5:30
Murder Case : दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
डोंबिवली : येथील पश्चिमेकडील बावनचाळीतील रेल्वे ग्राऊंडवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह खून केलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारी आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसताना या खूनाचा गुन्हा उकल करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. कोणताही पुरावा नसताना घटनास्थळी आढळुन आलेल्या एका व्यक्तीच्या टोपीमुळे आरोपी अर्जून आनंदा मोरे (वय ३९) याला अवघ्या १२ तासाच्या आत बेडया ठोकल्या आहेत. दारूच्या नशेत मृत व्यक्ती आणि मोरे याच्यात वाद झाला आणि त्यात खून झाल्याची घटना घडल्याची माहीती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.
मृत व्यक्तीचे वय साधारण ४५ ते ५० वयोगटातील असून त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर जोरात प्रहार केल्याच्या खुणा दिसत असल्याने त्याची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्यासह पोलिस निरिक्षक (गुन्हे)राहुलकुमार खिलारे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) मोहन खंदारे, सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश वडणे, पोलिस उपनिरिक्षक कुलदीप मोरे आदिंची विशेष पथके खूनाचा तपास करण्याकामी गठीत करण्यात आली होती.
तपासादरम्यान घटनास्थळी एक जांभळया रंगाची टोपी निदर्शनास पडली. ही टोपी मारेक-याची असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांना होता. परंतू टोपीच्या वर्णनावरून आजुबाजुला चौकशी केली असता ती टोपी फिरस्ता राकेश पाटील नामक व्यक्तीची असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्याचा शोध घेतला तो डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात आढळुन आला. त्याच्याकडे चौकशी केली असता आम्ही ग्राउंडवर दारू पिण्यास बसलो असताना अर्जून आणि अनोळख्या व्यक्तीची वादावादी झाली. यात अर्जूनने संबंधित व्यक्तीवर दांडक्याने हल्ला केला. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही अशी माहीती राकेशने पोलिसांना दिली. दरम्यान राकेशने दिलेल्या माहीतीवरून पोलिसांनी तपास करीत आरोपी अर्जूनला पश्चिमेकडील गांधी उद्यान परिसरातून अटक केली.
मृतदेहाची ओळख पटलेली नाही
सोमवारी मृतदेह आढळून आला. परंतू अद्याप हा मृतदेह कोणाचा आहे याचा तपास लागलेला नाही. तो बिगारी काम करणारा असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. त्याचे कोणी नातेवाईक आहेत का याचा शोध सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त कुराडे यांनी दिली.