अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचे गूढ उकलले, प्रेयसीच्या पतीचा केला अडसर दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 05:49 PM2022-04-04T17:49:58+5:302022-04-04T17:50:19+5:30
The mystery of the murder Solved : पोलिसांनीही आपले कसबपणाला लावून नेर शहरातील या हत्याकांडात तिघांना अटक केली.
नेर : प्रेयसीचा पती संबंधात अडसर ठरत असल्याने प्रियकराने मित्राच्या मदतीने त्याचा खून केला. मात्र घटनेचा देखावा तंतोतंत अपघातासारखा केला. त्यामुळे तीन वर्षानंतर हा गुन्हा उघड झाला आहे. त्यातही मृताच्या बहिणीने पुढे येत आरोपींवर संशय व्यक्त केला. पोलिसांनीही आपले कसबपणाला लावून नेर शहरातील या हत्याकांडात तिघांना अटक केली.
अनिल सुखदेव बोरकर (४०) यांचा २९ फेब्रुवारी २०२० रोजी बोंडगव्हाण रस्त्यावर मृतदेह सापडला होता. अनिलच्या अंगावर ओरबडल्याच्या खुणा होत्या. काही जखमाही दिसल्या. मात्र हा अपघात की हत्या या संभ्रमात पोलीस होते. गुन्ह्याची उकल झाली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद घेतली. दरम्यानच्या काळात संजय अंबरसिंग आडे (२७) रा. मांगुळ ह.मु. हनुमाननगर नेर हा अनिलच्या पत्नीसोबत राहू लागला. त्याने अनिलच्या पत्नीच्या नावाने असलेल्या शेतावर कर्ज उचलून वाहन खरेदी केली. यावरून अनिलची बहीण शालू नरेश मेश्राम रा. भीमनगर नेर हिला संशय आला. तिने याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांना दिली. पोलिसांनी सखोल चौकशी करून तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात येताच आरोपी संजय आडे, त्याचा मित्र शुभम नारायण तडसकर रा. आसेगाव देवी, याेगेश अशोक घावडे रा. अंतरगाव ता. बाभूळगाव यांना ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. नेर ठाणेदार ज्ञानेश्वर घुग, फौजदार गजानन अजमिरे, प्रदीप खडके, राजेश चौधरी, सुनील राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करीत आरोपींना अटक केली. पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
अशी केली हत्या
अनिल बोरकर याला २८ फेब्रुवारी २०२० ला यवतमाळ येथे सोबत नेले. परत येत असताना आरोपींनी वाहनात शेल्याने गळा आवळून त्याचा खून केला. नंतर बोंडगव्हाण शिवारात मृतदेह फेकून अपघाताचा देखावा निर्माण केला, अशी कबुली पोलिसांकडे दिली.
बॉक्स
योगेश भोंडेच्या खुनाचाही संशय
आरोपी संजय आडे हा हनुमानगर येथे शालिक भोंडे यांच्याकडे किरायाने राहत होता. आरोपीचा घरमालकाचा मुलगा योगेश याच्याशी पैशाच्या उसनवारीवरून वाद असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे योगेशचा खून संजयने केला असावा असा संशय व्यक्त होत आहे. योगेश भोंडे याचा मृतदेह सोनवाढोणा घुई रस्त्यावर आढळला होता. मात्र या खुनाची संजयने अजूनपर्यंत कबुली दिली नसल्याचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी सांगितले. दोन्ही घटनेत गुन्ह्याची पद्धत जवळपास मिळती जुळती असल्याने पाेलीस त्या दिशेनेही तपास करीत आहे.