अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडलं; आरोपीला ७२ तासांत दिल्लीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 08:42 PM2024-05-31T20:42:35+5:302024-05-31T20:42:52+5:30

पोलिसांनी मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यावर भाचा नजाबुद्दीन सम्मी (२१) हा असल्याचे सांगून दोघांचे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली

The mystery of the murder of the unknown woman is revealed; The accused was arrested from Delhi within 72 hours | अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडलं; आरोपीला ७२ तासांत दिल्लीतून अटक

अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडलं; आरोपीला ७२ तासांत दिल्लीतून अटक

मंगेश कराळे

नालासोपारा - अनोळखी महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडून आरोपीला ७२ तासांत दिल्ली येथून अटक केल्याची माहिती पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचेही त्यांनी सांगितले.

धानिवबागच्या हरवटेपाडा येथील धोदाडा डोंगराच्या ओव्हळात २८ मे रोजी ३५ ते ४० वयोगटातील सलवार सूट घातलेला महिलेची मानेवर, छातीवर लोखंडी चाकूने वार हत्या करून फेकलेला मृतदेह सापडला होता. पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य घेऊन महिलेची ओळख पटवून आरोपीला अटक करण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिल्या होत्या.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सोपान पाटील आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी निरोध आणि स्प्रे मिळाला होता. यावरून धानिवबाग परिसरातील मेडिकलमधून या वस्तू घेतल्याची शक्यता असल्याने प्रत्येक मेडिकलमध्ये तपास सुरू केला. यावेळी एका मेडिकलमधून एका आरोपीने या वस्तू घेतल्याचे सीसीटीव्हीमधून निष्पन्न झाले.

या मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी मतदार याद्या पोलिसांनी प्राप्त केल्या. महिलेच्या पेहरावावरून मुस्लिम वाटत असल्याने मुस्लिम महिलांच्या नावाची शॉर्टलिस्ट तयार केली. त्यानंतर प्रत्येक घरे शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी धानिवबाग तलाव येथे राहणाऱ्या जियाउल्लाह शाह याच्या घरी दोन मुले दिसून आली. त्यावेळी माहिती मिळाली की त्यांची पत्नी ३ दिवसांपासून बेपत्ता असल्याने पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती मिळाली. त्यांना भेटून पोलिसांनी फोटो दाखविल्यावर त्यांची पत्नी सायरा (३४) हिचा असल्याचे ओळखले.

पोलिसांनी मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेज दाखविल्यावर भाचा नजाबुद्दीन सम्मी (२१) हा असल्याचे सांगून दोघांचे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना दिली. नजाबुद्दीनच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती घेऊन गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम दिल्लीला रवाना झाली. नजाबुद्दीनचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्लीतील अमनविहार येथे शोध घेतला. तो एका बेकरीमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रात्रभरात ९० ते १०० बेकऱ्या तपासून आरोपीला ताब्यात घेतले. त्याने महिलेसोबत अनैतिक संबंधातून वाद झाल्याने २७ मे रोजी नालासोपाऱ्यात येऊन चाकूने गळा चिरून व छातीत खुपसून हत्या करून पळून गेला. पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त जयंत भजबळे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, पोलीस निरीक्षक (प्रशासक) शकील शेख, गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सफौ. सुरेंद्र शिवदे, बाळासाहेब घुटाळ, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, रवि वानखेडे, किरण आव्हाड, मिथुन मोहिते, निखिल मंडलिक, संजय मासाळ, राहुल कर्पे, अभिजित नेवारे, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, नामदेव ढोणे, सोहेल शेख यांनी केली आहे.

Web Title: The mystery of the murder of the unknown woman is revealed; The accused was arrested from Delhi within 72 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.