उदयपूरच्या घटनेचा महाराष्ट्र-गुजरातमधील खुनांशी संबंध, NIA त्या अँगलने करणार तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:31 PM2022-07-01T19:31:46+5:302022-07-01T19:32:40+5:30
Udaipur Murder: कन्हैया लाल यांच्या निर्घृण हत्येचा तपास करणारी राष्ट्रीय सुरक्षा संस्था, महाराष्ट्र आणि गुजरातमधील हत्येच्या घटनांचा उदयपूर घटनेशी संबंध जोडून तपास करत आहे.
Udaipur Murder:राजस्थानच्या उदयपूरमध्ये शिंपी कन्हैया लाल यांच्या निर्घृण हत्येचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (NIA) करत आहे. आता एजन्सीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, NIA या प्रकरणाचा तपास, गुजरात आणि महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या हत्येशी जोडून करणार आहे.
नुपूर शर्माच्या समर्थनार्थ कन्हैया लाल यांनी सोशल मीडियावर कथित पोस्ट केली होती. त्याचा राग मनात धरुन दोन मुस्लिम तरुणांनी कन्हैया लाल यांची दुकानात घुसून निर्घृण हत्या केली. त्यांच्या हत्येमुळे देशभारात संतापाची लाट आहे. या घटनेविरोधात राजस्थानमध्येही अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. आता या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. आरोपी तरुणांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी संबंध आढळून आले आहेत.
या खुनांशी संबंध ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे या वैद्यकीय व्यावसायिकाचा महाराष्ट्रातील अमरावती येथे शिरच्छेद करण्यात आला होता. याप्रकरणी अब्दुल शोएब, मुदस्सर आणि शाहरुख या तीन आरोपींना अटक करण्यात आली.
त्यापूर्वी, 25 जानेवारी रोजी गुजरातमधील धंडुकातील मोधावाला भागात 30 वर्षीय किशन भारवाडची हत्या करण्यात आली होती. शब्बीर आणि इम्तियाज यांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएसने केला होता. वास्तविक, 6 जानेवारीला किशनने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी भगवान कृष्ण पैगंबर मोहम्मद पेक्षा महान असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर त्यांनी या पोस्टबद्दल माफीही मागितली.
एनआयएला साम्य आढळले
या सर्व घटनांमध्ये साम्य असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा एकाच अँगलने तपास केला जाणार आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकरणात आरोपी सहज पकडले गेले. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. त्याचबरोबर या घटनांचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध आहे का, याचाही तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.