चिठ्ठीतून झाला उलगडा; वाराणसीतील चौघांच्या मृत्यूमागे पैसा अन् राजकीय दबाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2023 12:55 PM2023-12-09T12:55:43+5:302023-12-09T12:56:04+5:30
कोंडा बाबू (50), लावण्या (45), राजेश (25) आणि जयराज (23) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सामूहिक आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. एकाच कुटुंबातील ४ सदस्यांनी धर्मशाळेतील एका खोलीत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. आत्महत्या केलेले सर्वजण आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये आई-वडिलांसह दोन तरुण मुलांचा समावेश आहे. आता, या आत्महत्या प्रकरणातील गूढ उलगडलं असून राजकीय दबाव आणि आर्थिक तंगीतून त्यांनी आत्महत्या केल्याचा उलगडा मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून झाला आहे.
कोंडा बाबू (50), लावण्या (45), राजेश (25) आणि जयराज (23) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. त्यामध्ये, पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण ३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता वाराणसी येथे आले होते. काशी यात्रा करणार असल्याचे सांगत त्यांनी खोली बुक केली. आपण, ७ डिसेंबर रोजी सकाळी खोली खाली करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांनी खोलीत सामूहित आत्महत्या केल्याचं समोर आलं.
पोलिसांना घटनास्थळावरुन तेलुगू भाषेत लिहिलेली सुसाईड नोट आढळून आली होती. आंध्र प्रदेशातील स्थानिक ठिकाणी पैशावरुन त्यांचा वाद सुरू होता. त्यावरुन, ते त्रस्त होते. सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या अनुसार, मांडा पेटा येथील दुर्गा दिव्यश्री ऑटो कन्सल्टन्सी कंपनी येथे मृतक राजेश काम करत होता. राजेशने खासगी कामासाठी कंपनी मालकाकडून ६ लाख रुपये घेतले होते. त्यामुळे, दुकानदार- पेंटगदल प्रसाद, रामीरेड्डी वीर लक्ष्मी आणि मल्ली बाबू यांनी राजेशच्या कुटुंबीयांस त्रास दिला. त्यावरच ते थांबले नाहीत, तर कुटुंबातील सदस्यांच्या १०-१० पेपरवर कोऱ्या सह्या घेतल्या. तसेच, २० ब्लँक चेकवरही सह्या घेतल्या होत्या.
सुसाईड नोटमधील मजकुरानुसार पीडित कुटुंबाने घरातील सर्वच दागिने आणि इतर वस्तू विकून ५ लाख रुपयांचे कर्ज फेडले होते. मात्र, तरीही दुकानमालक व संबंधितांकडून सह्या घेतलेले पेपर्स आणि ब्लँक चेक परत केले जात नव्हते. याउलट, माजी मुख्यमंत्री व बड्या राजकीय व्यक्तीच्या नावाने धमकीही दिली होती. तसेच, १० दिवसांत ६ लाख रुपये देण्याचं बजावलं होतं. त्यामुळे, पीडित कुटुंब आंध्र प्रदेशातून निघून गेलं. कोलकातात, तामिळनाडू, हरिद्वार असा प्रवास करत ते वाराणसीला पोहोचले होते. आपल्या मृत्यूस दुकानदार- पेंटगदल प्रसाद, दुकानातील कर्मचारी- रामीरेड्डी वीर लक्ष्मी आणि राजकीय दबाव टाकणाऱ्या मल्ली बाबूंना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या तिघांना शिक्षा देऊन न्याय मिळावा, अशी मागणीह चिठ्ठीत करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन महिन्यांच्या भटकंतीनंतर हे कुटुंब वाराणसीत पोहोचले होते. त्यानंतर, येथील एका धर्मशाळेत त्यांनी एकत्रितपणे आत्महत्या केली. वाराणसीतील दश्वामेध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवनाथपूर पांडेहवेली परिसरात आंध्र आश्रम म्हणून एक धर्मशाला आहे. येथील खोली नंबर एस-६ मध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. मात्र, गुरुवारी सायंकाळपर्यंत कुटुंबातील कोणीही खोलीतून बाहेर आले नाही, किंवा खोलीही उघडल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे, धर्मशाळेच्या व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर, त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. पोलिसांच्या समोर बंद खोली उघडली असताना सामूहिक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.