वृद्धाला लुटून पळाले, अपघातात सापडले; इराणी टोळीच्या दोन सराईतांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 09:54 AM2022-08-04T09:54:58+5:302022-08-04T09:55:06+5:30
मंगळवारी दुपारच्या सुमारास सीबीडी सेक्टर ५ येथील एसबीआय बँकेत हा प्रकार घडला. परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वृद्ध व्यक्तीच्या हातातली रक्कम लुटून पळ काढणाऱ्या इराणी टोळीच्या दोघांना सीबीडी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गुन्ह्यानंतर मोटारसायकलवरून पळ काढत असताना रिक्षाला धडकल्याने त्यांचा अपघात झाला. त्यामुळे नागरिक व नाकाबंदीतल्या पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. या अपघातामध्ये गुन्हेगारांसह रिक्षातले दोघे जखमी झाले असून, उपचारानंतर पोलिसांनी चोरट्यांना अटक केली.
मंगळवारी दुपारच्या सुमारास सीबीडी सेक्टर ५ येथील एसबीआय बँकेत हा प्रकार घडला. परिसरात राहणारे ज्येष्ठ नागरिक पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. यावेळी बँकेतून ४० हजार काढल्यानंतर ते पैसे मोजत असतानाच दबा धरून बसलेल्या गुन्हेगाराने त्यांच्याकडील रक्कम हिसकावली. त्यानंतर मोटारसायकलवर तयारीतच असलेल्या साथीदारासह दोघांनी पळ काढला; परंतु काही अंतरावर एका रिक्षाला त्यांची मोटारसायकल धडकली. गुन्हा करून पळत असल्याने त्यांची मोटारसायकल वेगात असल्याने हा अपघात झाला. नागरिक व काही अंतरावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचे नाव मेहंदी हसन लालू जाफरी व मोहसीन लालू खान असल्याचे समोर आले.
अपघातामध्ये या दोघांसह रिक्षा चालक व रिक्षातील ८ वर्षांचा मुलगा जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उपचारानंतर मंगळवारी रात्री पोलिसांनी मेहंदी व मोहसीन या दोघांना अटक केली आहे. दोघेही मुंब्र्याचे राहणारे असून, सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून वृद्धाची लुटलेली रक्कम जप्त केली आहे.
वृद्धाच्या हातातून पैसे खेचत असताना रक्कम खाली पडल्याने त्यांच्या हाती केवळ तेवढीच रक्कम लागली होती. दोघेही सराईत इराणी टोळीचे सदस्य असल्याने सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी निरीक्षक उमेश गवळी, सहायक निरीक्षक पवन पाटील, सचिन मोरे यांचे पथक
नेमले होते.
गुन्ह्यासाठीची मोटारसायकल चोरीची
गुन्हेगारांनी वापरलेली मोटारसायकल कोपरखैरणेतून तीन महिन्यांपूर्वी चोरली होती. यासाठी त्यांनी बनावट आरसीबुकच्या आधारे गाडीवर बनावट नंबरही टाकला होता. मोहसीन व मेहंदी सराईत गुन्हेगार असून मोहसीनवर २, तर मेहंदीवर ७ गुन्हे दाखल आहेत. मेहंदी याच्यावर यापूर्वी मकोकाअंतर्गतदेखील कारवाई झाली आहे, तर वृद्धाला लुटल्याप्रकरणी त्यांच्यावर सीबीडी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.