ज्याच्याशी लग्नासाठी घरच्यांशी भांडली, त्यानेच दीड महिन्यांत तिला संपविले, प्रेम कहाणीचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 10:28 AM2023-05-30T10:28:04+5:302023-05-30T10:28:48+5:30
गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली.
दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची प्रियकराने हत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना मेरठमधून धक्कादायक बातमी हाती येत आहे. गुरुग्रामच्या दीपाने कुटुंबाचा विरोध पत्करून साजन उर्फ गौरवशी दीड महिन्यांपूर्वी लग्न केले होते. परंतू, या लव्ह मॅरेजचा अंत झाला आहे.
गौरवने दीपाचा मृतदेह गुपचूपरित्या स्मशानभूमीत नेऊन जाळला आहे. याची माहिती ना पोलिसांना ना दीपाच्या घरच्यांना दिली गेली. जेव्हा पोलिसांना दीपाच्या आईने याची माहिती दिली, तेव्हा पोलिसांना दिपाच्या सासरचे लोक घराला टाळे ठोकून फरार झाल्याचे आढळले. तीन दिवसांपूर्वी दीपाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचे गौरवच्या शेजाऱ्यांनी सांगितले.
पोलीस ठाणे प्रभारी योगेंद्र सिंह यांनी सांगितले की, गुडगावच्या अनिता यांनी कंट्रोल रूमला फोन करून माहिती दिली. दीड महिन्यापूर्वी त्यांची मुलगी दीपाचा शेरगढी येथील साजन उर्फ गौरव याच्यासोबत कोर्ट मॅरेज झाले होते. दीपाच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. दीपा गौरवसोबत शेरगढी येथे राहू लागली होती. 26 मे रोजी दीपाची हत्या केल्यानंतर सासरच्यांनी तिच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार केल्याची माहिती अनिताला कोणीतरी दिली. याबाबत माहिती मिळताच मेडिकल पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तेथे कोणीही आढळून आले नाही. सासरचे लोक पळून गेले आहेत.
तीन दिवसांपूर्वी दीपाला सासरचे लोक आजारी असल्याचे सांगून घेऊन गेले होते, त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे समजले, असे शेजाऱ्याने पोलिसांना सांगितले. दीपाच्या नातेवाईकांना मेरठला बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतरच संपूर्ण घटना समजेल. दीपाचा पती साजन आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे, असे पोलीस म्हणाले.
गुरुग्राममधील झाझर रोडवरील हॉस्पिटलमध्ये दीपा कामाला होती. इन्स्टाग्रामवर साजनशी ओळख झाली. साजन गुरुग्राममधील एका कंपनीत सुपरवायझर होता. यामुळे त्यांची वारंवार भेट होऊ लागली. तीन वर्षांपासून दोघेही एकमेकांसोबत राहू लागले होते. सहा महिन्यांपूर्वी दीपाने तिच्या कुटुंबीयांना साजनबद्दल माहिती दिली होती. तेव्हा दीपाला विरोध करण्यात आला होता. यामुळे दीड महिन्यापूर्वी दीपाने घर सोडले आणि साजनसोबत कोर्टात लग्न केले.
अनिता यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमविवाहानंतर आम्ही माघार घेतली होती. दीपाशी रोज फोनवर बोलणे व्हायचे. रविवारपासून दीपाचा मोबाईल लागत नव्हता. यामुळे तिच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधला तेव्हा आम्हाला हे समजले.