सामूहिक विवाह आयोजित करणाऱ्यानेच केला कार्यालयातील तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 10:44 PM2022-06-07T22:44:32+5:302022-06-07T22:44:42+5:30
सदर कार्यालयात गेल्या पाच - सहा महिन्यापासून १८ वर्षीय तरुणी काम करत होती.
मीरा रोड - महिला - मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करून स्वतःला समाजसेवक म्हणवणाऱ्या संस्थेचा अध्यक्ष धर्मेंद्र शर्मा याला त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी नवघर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. पीडित तरुणी ही पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी आहे.
भाईंदर पूर्वेच्या आरएनपी भागात राहणाऱ्या शर्मा याची राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट नावाची संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून कन्यादान उपक्रम अंतर्गत सामूहिक विवाह सोहळे आयोजित करत त्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्मा हा देणग्या गोळा करतो. त्याचे सेवन स्क्वेअर शाळेच्या परिसरात कार्यालय आहे.
सदर कार्यालयात गेल्या पाच - सहा महिन्यापासून १८ वर्षीय तरुणी काम करत होती. सोमवारी दुपारी शर्मा याने तरुणीला आपल्या दालनात बोलावून तिचा विनयभंग केला. घडल्या प्रकाराने अस्वस्थ असलेल्या तरुणीने घटनेची माहिती आपल्या आईला दिली. एरवी महिला व मुलींसाठी समाजकार्य करत असल्याचे दाखवणाऱ्या शर्माचा हा प्रकार ऐकून तिची आई देखील संतप्त झाली. मंगळवारी याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शर्मा याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून संस्थेशी संबंधित महिला कार्यकर्त्या तसेच शहरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे