मालकाने केला ट्रक चोरीचा बनाव; मालट्रकसह एक कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त
By मनोज शेलार | Published: March 2, 2024 05:49 PM2024-03-02T17:49:20+5:302024-03-02T17:49:42+5:30
याप्रकरणी ट्रक मालकासह चालकाला आणि ट्रक विकत घेणाऱ्या अशा तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
नंदुरबार : ट्रक चोरीचा बनाव करून ट्रक मालकाने चालकासह सुमारे एक कोटी ८१ लाख रुपयांची तांब्याची तार लंपास करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी शिताफीने तपास करून ट्रक मालकाचा भंडाफोड केला. याप्रकरणी ट्रक मालकासह चालकाला आणि ट्रक विकत घेणाऱ्या अशा तिघांविरुद्ध म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रानुसार, २७ फेब्रवारी रोजी गुजरातमधून एक कोटी ८१ लाख रुपयांची २० टन तांब्याची तार भरून मध्य प्रदेशकडे जाणारा मालट्रक (क्रमांक एमएच १८ एए ८९९६) खेडदिगर शिवारातून चोरीस गेल्याची फिर्याद म्हसावद पोलिसांत दाखल झाली होती. त्या चोरीचा तपास करताना पोलिसांना मालट्रक मालक रमेश पाटील यांनीच तो ट्रक धुळे येथील मोहम्मद नुमान हमीद शहा यांना विकल्याचे समजले. पोलिसांनी शहा यांना अटक केली असता त्यांनी रमेश पाटील यांनी मालट्रक विकल्याचे सांगितले. त्यातील तांब्याच्या तारेची चौकशी केली असता रमेश पाटील व चालक मजहर सुकीखान, रा. राजपूर यांनी शहादा तालुक्यातील जावदे तर्फे बोरद शिवारातील शेतात लपविल्याची माहिती दिली. पोलिसांनी तेथून एक कोटी ८१ लाखाची तांब्याची तार आणि आठ लाखांचा मालट्रक असा एकूण एक कोटी ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून रमेश पाटील, मजहर सुकीखान व मोहम्मद नुमान हमीद शहा या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.