यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 05:07 AM2024-06-17T05:07:14+5:302024-06-17T05:07:53+5:30
गोळीबार प्रकरणात नवा गुन्हा दाखल.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या एप्रिलमधील गोळीबारप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविवारी नवा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, यू-ट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करून सलमानला ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली राजस्थानातून बनवारीलाल लातुरलाल गुजर (२५) याला अटक करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपी गुजर हा मूळचा राजस्थानमधील बुंदी परिसरातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. त्यात त्याने असे म्हटले होते की लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि इतर टोळीचे सदस्य माझ्यासोबत आहेत आणि मी सलमान खानला मारणार आहे. कारण त्याने अद्याप माफी मागितली नाही.
आरोपीने राजस्थानमधील एका महामार्गावर व्हिडीओ बनवला आणि तो त्याच्या चॅनलवर अपलोड केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी पोलिसांचे एक पथक राजस्थानला पाठवण्यात आले. त्याने आरोपीला ताब्यात घेत सायबर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीवर आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रकरण काय?
सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर १४ एप्रिलच्या पहाटे मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी गोळीबार केला होता. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक अनुज थापन याने १ मे रोजी पोलिस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
बिश्नोईचा ताबा घेणार
- नवी मुंबई पोलिसांनी सलमान खान गोळीबार प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीच्या संशयितासह पाच जणांना अटक केली होती. टोळीच्या चार सदस्यांनी सलमानचे फार्महाऊस, त्याचे वांद्रे निवासस्थान आणि त्याच्या चित्रीकरणाच्या ठिकाणांची टेहळणी (रेकी) केली होती.
-अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बिश्नोईला ताब्यात घेण्याची पोलिसांची योजना आहे. त्याचा भाऊ अनमोल कॅनडामध्ये असल्याचे समजते, तो देखील या करणात पोलिसांना हवा आहे.