सलमान खानला रस्त्यावरच मारण्याचा होता प्लॅन; २ वेळा प्रयत्न फसला, खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:56 AM2022-09-16T07:56:46+5:302022-09-16T07:56:56+5:30
मागील चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. या गँगने सलमानच्या हत्येचा यापूर्वी चार वेळा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसच्या रस्त्यावरच मारण्याची योजना लॉरेन्स गँगने बनवली होती, असा नवा खुलासा समोर आला आहे.
मागील चार वर्षांपासून लॉरेन्स बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. या गँगने सलमानच्या हत्येचा यापूर्वी चार वेळा प्रयत्न केला. लॉरेन्स गँगने गेल्या तीन महिन्यांत सलमानवर हल्ल्याचे आणखी दोन प्रयत्न केले. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पंजाब पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कपिल पंडित याला अटक केली होती. त्याने चौकशीदरम्यान सलमानच्या हत्येच्या कट रचल्याचे उघड करून कटाची माहिती पोलिसांना सांगितली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यापूर्वी लॉरेन्सने सलमानला मारण्याचा कट रचला होता. गोल्डी बराड या प्लॅनचा सर्वेसर्वा होता. त्याने सलमानची हत्या करण्यासाठी कपिल पंडित (लाॅरेन्स टोळीचा शार्पशूटर) याची निवड केली होती.
शूटर्स दीड महिना थांबले, रेकीही केली
मुंबईच्या पनवेल भागात कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर शूटर भाड्याची खोली घेऊन थांबले होते. कारण, सलमानचे फार्म हाऊस याच भागात आहे. जवळपास दीड महिना ते या भागात थांबले होते. लॉरेन्स गँगच्या शूटर्सनी हल्ल्यासाठी खोलीत छोटी शस्त्रे, पिस्तूल व काडतूस ठेवले होते. हिट ॲण्ड रन घटनेनंतर सलमान खान गाडीचा वेग कमी ठेवतो. सलमान जेव्हा पनवेलच्या फार्म हाऊसवर येतो. तेव्हा त्याच्यासोबत त्याचा अंगरक्षक शेराही असतो, अशी माहिती या शूटर्सनी गोळा केली होती.
सलमानची हत्या का करायची आहे?
सलमानने काळविटाची शिकार केल्यापासून लॉरेन्स त्याच्यावर नाराज आहे. तो तेव्हापासून सलमानची हत्या करू इच्छितो. आपला समुदाय काळविटाचा रक्षक आहे. त्यामुळे आपण सलमानचे प्राण घेऊ इच्छितो, असे लॉरेन्सने म्हटले आहे.