पोलीस बनले आई! तीन वर्षाच्या मुलाला पाजले दूध अन् कडेवर घेऊन फिरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 09:09 PM2022-02-13T21:09:12+5:302022-02-13T21:09:41+5:30
Police News : दोघेही एकटेच बोलायला गेले असता त्यांनी तेथून पळ काढला आणि त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला तिथेच सोडून दिले.
पंचकुला - हरियाणातील पंचकुला जिल्ह्यात एका 3 वर्षाच्या मुलाला त्याच्या पालकांनी पोलिस स्टेशनमध्ये सोडून पळ काढला. वास्तविक, पंचकुलातील मोरनीच्या गावातील कोलयो येथील एक पती-पत्नी त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. एसआय रीता देवी यांनी त्यांना सांगितले की, तुम्ही पती-पत्नी दोघांनी एकदा बाहेर जाऊन एकांतात बोला. मात्र दोघेही एकटेच बोलायला गेले असता त्यांनी तेथून पळ काढला आणि त्यांच्या 3 वर्षाच्या मुलाला तिथेच सोडून दिले.
एसआय रीता यांनी सांगितले की, आम्ही दिवसभर मुलाच्या पालकांना फोन करत राहिलो, परंतु दोघेही मुलाला घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे त्या 3 वर्षाच्या चिमुकल्याला महिला ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दिवसभर चोख सांभाळ ठेवला होता. त्या मुलासाठी दुधाच्या बाटलीची व्यवस्था करण्यात आली होती. काही वेळाने मुलानेही चॉकलेटची मागणी करण्यास सुरुवात केली. तर मुलासाठी चॉकलेट आणि काही खेळणीही आणली होती.
मुलाने जी मागणी केली, तीच वस्तू बाजारातून आणली. एवढेच नाही तर मुलाने पोलिसांच्या टोप्या घालण्याचा हट्टही केला. ज्यावर महिला पोलिस स्टेशनच्या SHO नेहा चौहान यांनी आपली टोपी काढून मुलाच्या डोक्यावर ठेवली आणि मुलही खूप आनंदी झाले.
जेव्हा ही बाब पंचकुलाचे डीसीपी मोहित हांडा आणि पंचकुलाचे आयुक्त सौरव सिंह यांच्या निदर्शनास आली तेव्हा त्या मुलाच्या पालकांना कडक शब्दात समज देऊन पाचारण करण्यात आले. त्याची आई मुलाला घ्यायला पोहोचली नाही पण त्याचे वडील नक्कीच आले. जननायक जनता पक्षाचे नेते अजय गौतम आणि सुदेश राणी यांनी मुलाच्या वडिलांना पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी रात्री उशिरा मुलाला त्याच्या वडिलांकडे परत केले.