दुर्दैवी घटना! अपघाताची पाहणी करायला गेलेल्या पोलिसालाच भरधाव कारने चिरडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:44 PM2022-11-23T23:44:54+5:302022-11-23T23:45:11+5:30

मदतीसाठी धावून गेलेले सातजण जखमी : नयाकुंडनजीकच्या सूतगिरणीजवळ अपघात

The policeman who went to inspect the accident was crushed by a speeding car! in Nagpur | दुर्दैवी घटना! अपघाताची पाहणी करायला गेलेल्या पोलिसालाच भरधाव कारने चिरडले!

दुर्दैवी घटना! अपघाताची पाहणी करायला गेलेल्या पोलिसालाच भरधाव कारने चिरडले!

googlenewsNext

पारशिवनी (नागपूर) : नयाकुंडनजीकच्या सूतगिरणीजवळ कार व ट्रकची धडक झाली. यात एकजण जखमी झाला. या घटनेचा पंचनामा सुरू असताना भरधाव कार घटनास्थळी आली. तिने पोलिसासह आठ लोकांना उडविले. यात एक पोलिस हवालदार मृत पावला, तर सातजण जखमी झाले. बुधवारी रात्री ८.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

जयंत विष्णू शेरेकर (४२, रा.रनाळा, कामठी) असे मृत हवालदाराचे नाव आहे. तो पारशिवनी पोलिस स्टेशन येथे कार्यरत होता. चंद्रप्रकाश टेकाडे (३२, रा. नयाकुंड), अमोल कनोजे (३०, रा. पारशिवनी), विक्रमसिंग भैस (४५, रा. नयाकुंड), आकाश कोलांडे (२५, रा. मेहंदी), संदीप तिजारे (३५, रा. मेहंदी), गौरव पणवेलकर (३२, रा.पारशिवनी), सागर सायरे (३८) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आमडी फाटा ते पारशिवनी रस्त्यावरील नयाकुंड येथील सूतगिरणीपासून एक किमी अंतरावर सदर अपघात घडला. सुरुवातीला आमडी फाट्याकडून कार पारशिवनीकडे येत होती. अशातच पारशिवनीकडून आमडी फाट्याकडे जाणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. ही घटना ८.१५ वाजेच्या सुमारास घडली. यात कारचालक विक्रमसिंग भैस कारमध्ये अडकला. या घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. तिथे पोलिस हवालदार जयंत शेरेकर सहकाऱ्यासोबत पोहोचले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते गौरव पणवेलकर, अमोल कनोजे हे पोलिसांना मदत करण्याकरिता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी विक्रमसिंग यांना कारबाहेर काढले. यानंतर जयंत शेरेकरसह एक पोलिस मौका पंचनामा करत होते.

यावेळी घटनास्थळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिस व गौरव पणवेलकर, अमोल कनोजे हे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करीत असताना आमडी फाट्याकडून एक कार (क्र. एमएच-४०-सीएच ६३९३) भरधाव वेगाने घटनास्थळाकडे ८.४५ वाजता आली. या कारचालकाने काही कळायच्या आत रस्त्यावर उभ्या पोलिस जयंत शेरेकरसह इतरांना जोरात धडक दिली. लागलीच सर्वांना पारशिवणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान जयंत शेरेकर मृत पावला. प्राथमिक उपचारानंतर जखमींना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडविणारी कार पारशिवणी पोलिसांनी जप्त केली. परंतु कारमधील व्यक्ती फरार आहेत. पुढील तपास पारशिवणी पोलिस करीत आहे.

Web Title: The policeman who went to inspect the accident was crushed by a speeding car! in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.