भाऊच निघाला वैरी, घर अन् रेशनसाठी संपवले कुटुंब; तिहेरी हत्याकांडाचा २४ तासात उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:01 AM2024-09-11T10:01:14+5:302024-09-11T10:01:40+5:30

गणपती सण असल्याने आरोपी कधी नव्हे तो आपल्या मामाकडे राहायला गेला. त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा मी मामाकडे होतो, असे आरोपीने भासवले होते

The Raigad police solved the triple murder in Neral within 24 hours and brother of the deceased was the main accused behind the murder | भाऊच निघाला वैरी, घर अन् रेशनसाठी संपवले कुटुंब; तिहेरी हत्याकांडाचा २४ तासात उलगडा

भाऊच निघाला वैरी, घर अन् रेशनसाठी संपवले कुटुंब; तिहेरी हत्याकांडाचा २४ तासात उलगडा

अलिबाग - नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाचा उलगडा रायगड पोलिसांनी २४ तासांत केला असून, या हत्याकांडामागे मृताचा भाऊच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडिलोपार्जित घर नावावर करीत नसल्याने, तसेच रेशनचे धान्य मिळत नसल्याने आरोपी हनुमंत पाटील याने तिघांची हत्या केली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नेरळमधील चिकन पाडा येथे मदन पाटील, त्यांची अनीषा उर्फ माधुरी पाटील पत्नी व मुलगा यांची ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता अज्ञाताने हत्या केल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे  यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर कर्जत उपविभागीय अधिकारी धुळा टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ, कर्जत पोलिस, तसेच स्थानिक गुन्हे विभागाने कोणताही पुरावा नसताना हत्येचा उलगडा केला आहे.

कपडे बदलले आणि तो सापडला
गणपती सण असल्याने आरोपी कधी नव्हे तो आपल्या मामाकडे राहायला गेला. त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा मी मामाकडे होतो, असे आरोपीने भासवले होते. मात्र, गुन्हा करताना आरोपीने सफेद शर्ट घातला होता, तर सकाळी अंगावर लाल टी शर्ट होता. तसेच शाळेतील सीसीटीव्हीमध्ये तो ये-जा करताना दिसला. त्याला पोलिसांनी संशयित म्हणून आधीच ताब्यात घेतले होते. पण, पोलिस चौकशीत समर्पकपणे उत्तरे दिल्याने पोलिसांवर त्याला सोडण्यापर्यंत वेळ आली होती. पण, पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केलाच.

...अशी केली हत्या
हनुमंत याने आपल्या मोठ्या भावाच्या कुटुंबाला संपविण्यासाठी कुऱ्हाडीचा वापर केला होता. तिघांची कुऱ्हाडीने हत्या केल्यानंतर रक्त उडू नये म्हणून आरोपीने त्यावर लगेच कपडा टाकला. त्यामुळे घरात भिंतींवर रक्ताचे डाग अधिक प्रमाणात उडाले नसल्याचे तपासात उघड झाले.

...असा होता वाद
आरोपी हनुमंत आणि मदन हे एकाच घरातील दोन खोल्यांमध्ये शेजारी शेजारी राहात होते. हे वडिलोपार्जित घर भाऊ मदन यांच्या नावावर होते. रेशन कार्डदेखील एकत्रित असल्याने मदनकडेच होते. त्यामुळे अर्धे घर नावावर करण्यासाठी आणि रेशन देण्यावरून दोन्ही भावांची भांडणे होती.

तिहेरी हत्याकांडाचा तपास हा स्थानिक गुन्हे विभाग, नेरळ पोलिस यांनी यशस्वीपणे उघड केला आहे. आता दीड महिन्यात आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करू - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक, रायगड

Web Title: The Raigad police solved the triple murder in Neral within 24 hours and brother of the deceased was the main accused behind the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.