जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 01:50 PM2023-07-31T13:50:58+5:302023-07-31T13:51:48+5:30

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

The reason for firing in Jaipur-Mumbai train came to light; What was the tension of the RPF jawan? | जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

जयपूर-मुंबई ट्रेनमधील गोळीबारीचं कारण आलं समोर; RPF जवानाला कोणतं होतं टेन्शन?

googlenewsNext

मुंबई – जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरनजीक झालेल्या हत्याकांडात नवा खुलासा समोर आला आहे. वादावादीत एका आरपीएफ जवानाने अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार करत त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपी जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. तर ४ मृतदेह पोस्टमोर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्रासह देशात खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची पोस्टींग आरपीएफ गुजरातला झाली होती. फायरिंग करणारा आरोपी जवान हादेखील गुजरातमध्येच पोस्टिंगला होता. या दोघांना एस्कॉर्ट ड्युटीला तैनात केले होते. आरोपी चेतनने सर्व्हिस बंदुकीने त्यांच्यावर हल्ला केला. जयपूर-मुंबई एक्सप्रेसच्या बी ५ या कोचमध्ये ही फायरिंग झाली. ही घटना सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फायरिंगमध्ये ४ लोकांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला.

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. आरपीएफ जवान आणि त्याचे सिनिअर अधिकारी यांच्यात काही कारणास्तव वाद झाला होता. ज्यानंतर रागाच्या भरात कॉन्स्टेबलने गोळीबार सुरू केला. पालघर ते बोरिवली स्टेशनदरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर ट्रेनची साखळी ओढून आरोपी चेतनने दहिसरनजीक ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मुंबईच्या बोरिवली पोलिसांच्या पथकाने कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

सूत्रांनुसार, आरोपी जवानाने त्याच्या मित्राला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आता मी नोकरीला थकलो आहे. VRS घेऊन निवृत्त होण्याचा त्याचा मानस होता. काही वर्षांपूर्वी सूरत RPF मध्ये पोस्टिंगवेळी ट्रेनमध्ये काही टोळक्यांनी टिकाराम यांना चाकू मारला होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले त्यातून ते बचावले.

टिकाराम हा प्रामाणिक माणूस होता. ट्रेनमध्ये एस्कॉर्टमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला तो झोपू देत नव्हता. आणि ड्युटीवर सतर्क राहण्यास सांगत असे. रात्रीच्या ड्युटीवर झोपलेल्या कॉन्स्टेबल चेतनला त्याने रोखले असावे, असा संशय आहे. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. वैयक्तिक वैरही नाकारता येत नाही. मात्र चेतनने इतर प्रवाशांना गोळ्या का मारल्या? हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याला ट्रेनमध्ये पकडले जाण्याची भीती होती का? या प्रश्नाचा शोध घेत आहे.  मृत आरपीएफ एएसआय टिकाराम मीणा यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. त्याची पत्नी काही कामासाठी गावाबाहेर गेली आहे. त्यांना या घटनेची माहितीही नव्हती. मुलगा आणि सून गोव्याला गेले आहेत. त्याचा फोन लागत नाही. तर आई खूप वृद्ध आहे, तिला नीट बघता-ऐकता येत नाही. मुलगी लग्नानंतर सासरी आहे.

 

 

Web Title: The reason for firing in Jaipur-Mumbai train came to light; What was the tension of the RPF jawan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.