दंगेखोर पोलिसांना म्हणाले, 'तुम्ही इथून चालते व्हा, अन्यथा तुम्हालाही संपवून टाकू!'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 11:28 AM2022-03-15T11:28:49+5:302022-03-15T11:32:20+5:30

Crime News : या घटनेनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून गर्दी पांगवली. दंगल घडविणारे तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांची नावे निष्पन्न करून संशयितांची रात्रभर धरपकड करण्यात आली.

The rioters told the police, 'Get out of here, or we'll kill you!' in Jalgaon | दंगेखोर पोलिसांना म्हणाले, 'तुम्ही इथून चालते व्हा, अन्यथा तुम्हालाही संपवून टाकू!'

दंगेखोर पोलिसांना म्हणाले, 'तुम्ही इथून चालते व्हा, अन्यथा तुम्हालाही संपवून टाकू!'

Next

जळगाव : पोलिसांनो, तुम्ही आमच्यात पडू नका, इथून चालते व्हा, अन्यथा तुम्हालाही संपवून टाकू अशी धमकी व चिथावणी देत दंगेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक करून व्हिडिओ चित्रण करणाऱ्या होमगार्डला मारहाण करीत त्यांचा मोबाईल फोडल्याची घटना रविवारी रात्री शहरातील काट्याफाईल ते राधाकृष्ण मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या ५० पेक्षा जास्त जणांवर सोमवारी शनीपेठ पोलिसात दंगल, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

इकराम म.ताहेर शेख (वय ३४, दालफळ, शनीपेठ), सै.मोहसीम सै.हनिफ (वय २४,रा.काट्याफाईल), खालीद शेख गुलाम रसूल शेख (वय ४४,रा.शनीपेठ), वैभव राजेंद्र अहिरे ऊर्फ बबलू वाणी (वय २२,रा.शनीपेठ), भोला राजू गवळी (वय २१,रा.गवळीवाडा), सुमित देविदास गवळी (वय १९,रा.रिधुरवाडा), महेश देविदास गवळी (वय २२,रा.गवळीवाडा) व दानिश शेख सत्तार काकर (वय २६,रा.काट्याफाईल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उसनवार पैसे घेतल्याने मुलाला मारहाण करण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून आला होता. दोन गटात दगडफेक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे दोन्ही गटांनी पोलिसांनाच कारवाई करण्यापासून मज्जाव करून इथून निघून जा, अन्यथा तुम्हालाच संपवून टाकू अशी धमकी देत पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. होमगार्ड भावेश रमेश कोठावदे व विलास भटा देसले यांना जमावाने गचांडी धरून मारहाण करायला सुरुवात केली. देसले यांनी घटनेचे चित्रण केल्याने त्यांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला.

संशयितांची रात्रभर धरपकड

या घटनेनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून गर्दी पांगवली. दंगल घडविणारे तसेच त्याला प्रोत्साहन देणाऱ्यांची नावे निष्पन्न करून संशयितांची रात्रभर धरपकड करण्यात आली. पहाटेपर्यंत दोन्ही गटाच्या आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्याशिवाय फरार झालेल्या अन्य संशयितांच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली. पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, होम डीवायएसपी विठ्ठल ससे, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, विजयकुमार ठाकूर आदी अधिकारी पहाटेपर्यंत थांबून होते. दरम्यान, या घटनेत पोलिसांकडून सरकारतर्फे सहायक फौजदार नंदकिशोर पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: The rioters told the police, 'Get out of here, or we'll kill you!' in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.