दरोडेखोरांनी व्यावसायिकाच्या घरात घुसून 30 लाखांचा ऐवज लुटला; पोलिस आल्यावर फेकला बॉम्ब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 04:36 PM2023-10-09T16:36:16+5:302023-10-09T16:36:30+5:30
मुख्य गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून महिलांचे दागिने लंपास केल्याचेही सांगण्यात येत आहे.
बिहारमधील मधुबनीमध्ये दरोडेखोरांनी मोठा दरोडा टाकला आहे. याठिकाणी रविवारी रात्री उशिरा दरोडेखोरांनी कापड व्यावसायिकाच्या घरावर दरोडा टाकला. यादरम्यान दरोडेखोरांनी पहिल्यांदा व्यावसायिकावर हल्ला केला आणि नंतर 30 लाखांहून अधिक रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. तसेच, मुख्य गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून महिलांचे दागिने लंपास केल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरोडेखोरांनी व्यावसायिकाच्या घरातील सदस्यांकडे कपाटाच्या चाव्या मागितल्या असता त्यांनी चावी देण्यास नकार दिला. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कापड व्यावसायिकाच्या कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये घरमालक राजकुमार गामी, त्यांची पत्नी चंद्रकला देवी, रणजित गामी, पिंटू गामी जखमी झाले आहेत.
घरातील नवीन सुनेचे दागिनेही दरोडेखोरांनी काढून घेतले. चोरटे दरोडा टाकत असताना गस्त घालत असताना पोलिस तेथे पोहोचले. त्यानंतर दरोडेखोरांनी पोलिसांवर बॉम्ब फेकला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. दरोडेखोरांच्या बॉम्बने तीन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन पोलिसांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, घटनेनंतर मधुबनीचे एसपी सुशील कुमार, बेनिपट्टीच्या एसडीपीओ नेहा कुमारी आणि फुलफरासचे एसडीपीओ घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच, त्यांनी या दरोड्या प्रकरणी भाष्य करण्यास टाळाटाळ केले आहे. तर लोकांचे म्हणणे आहे की, सहारघाट परिसरात सातत्याने चोरी आणि लुटमारीच्या घटना घडत आहेत, परंतु पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. गुन्हेगारांवर नियंत्रण नाही.