दरोडेखोर आता बाहेर येतील, पोलीस डोकावत राहिले; ते हातावर तुरी देत बँकेतून निसटले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 02:15 PM2023-12-06T14:15:03+5:302023-12-06T14:16:00+5:30
दरोड्यावेळी एक बँकेचा कर्मचारी कसाबसा बँकेबाहेर पडला, त्यानेच पोलिसांना सांगितले दरोडेखोर आत आहेत...
भोजपूर जिल्ह्यामध्ये अॅक्सिस बँकेच्या शाखेत दरोडा पडला होता. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास सात ते आठ सशस्त्र दरोडेखोर घुसले होते. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी बँकेला समोरून घेरले देखील. गोळीबार होणार हे गृहीत धरून पोलिसांचे रायफल, पिस्तुल अशा अद्ययावत शस्त्रे असलेले पथक देखील आले. बुलेट प्रूफ जॅकेटही मागविण्यात आले होते. परंतू, दरोडेखोरांनी पोलिसांच्याच हातावर तुरी देत निसटले.
या घटनेमुळे बाहेरून आतमध्ये डोकावणाऱ्या पोलीस यंत्रणेचे हसे झाले. दरोडेखोरांनी कॅश काऊंटरवरून १६ लाख रुपये बॅगेत भरले आणि बँकेच्या मागच्या दरवाजाने पळून गेले. जवळपास १०.५० मिनिटांनी ग्राहक म्हणून ते बँकेत आले होते. पिस्तुलीचा धाक दाखवून या लोकांनी ग्राहक तसेच बँक कर्मचाऱ्यांना धमकावले होते.
बँकेचे मॅनेजर असहर काझी यांच्यासह १४ जणांचा स्टाफ बँकेत काम करत होता. दरोडेखोरांनी चार मिनिटांतच हातात येईल ते घेतले आणि तिथून पोबारा केला. जाताना मॅनेजरसह अन्य कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. दरोडेखोरांचे वय जवळपास २१ वर्षे होते. बँक कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद केले होते, असे पोलिसांनी सांगितले.
बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने बँकेला घेरले होते. आत डोकावून पाहिले तर दरोडेखोर दिसत नव्हते. पोलिसांना वाटलेले की दरोडेखोर गेले त्याच दरवाजाने बाहेर येतील. तेव्हा चकमक होईल, परंतू दरोडेखोर मागच्या दरवाजाने पळून गेले होते.
दरोड्यावेळी एक बँकेचा कर्मचारी कसाबसा बँकेबाहेर पडल्याने बँकेवरील मोठी दरोडा टळल्याचे पोलिसांनी सांगितले. हा कर्मचारी बाहेर पडल्याने दरोडेखोर बिथरले आणि जेवढे मिळतील तेवढे पैसे घेऊन ते पसार झाले. त्याच कर्मचाऱ्याने पोलिसांना सुचना दिली.