घोटाळेबाज आरोपीचा शाही थाट; रुग्णालयात वापरतोय मोबाइल, टॅब! बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 06:36 AM2023-10-31T06:36:58+5:302023-10-31T06:37:32+5:30
कॉक्स अँड किंग्जचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर रुग्णालयात मोबाइल व टॅब वापरत असल्याची धक्कादायक बाब कारागृह विभागाच्या कारवाईतून समोर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पुण्यातील ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण ताजे असतानाच, कोट्यवधींच्या घोटाळ्यातील आरोपी जागतिक टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी असलेल्या कॉक्स अँड किंग्जचे प्रवर्तक अजय अजित पीटर केरकर हे रुग्णालयात मोबाइल व टॅब वापरत असल्याची धक्कादायक बाब कारागृह विभागाच्या कारवाईतून समोर आली आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते बॉम्बे रुग्णालयात यकृताच्या आजारावर उपचार घेत आहेत. यामागे नेमका कुणाचा हात आहे, याबाबत आझाद मैदान पोलिस तपास करत आहेत.
येस बँकेत करण्यात आलेल्या हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०२० मध्ये केरकरला अटक केली. ही बँकेची मोठी कर्जदार कंपनी होती. या कंपनीची ३,६४२ कोटींची थकबाकी आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचे मुंबई आणि यूकेमध्ये मुख्यालय आहे. कॉक्स अँड किंग्ज लि.चे कार्य २२ देश आणि ४ खंडांमध्ये पसरले आहे. केरकरविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहे. ईडी, सीबीआय, मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा व इतर एजन्सीने त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
बॉम्बे हॉस्पिटलमधील प्रकार
ईडीच्या कारवाईनंतर केरकर याची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. त्याची प्रकृती खालावल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र युनिटचे दोन अधिकारी दोन शिफ्टमध्ये तैनात होते.
गुरुवारी आर्थर रोड कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात अचानक भेट दिली असता, केरकरकडे फोन, टॅब आणि चार्जर सापडले. एवढी सुरक्षाव्यवस्था असताना त्यांच्याकडे फोन टॅब कसे आले? असा सवाल उपस्थित होत आहे.
कारागृह विभागाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आझाद मैदान पोलिसांनी केरकरविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन तडाखे यांनी दुजोरा दिला आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
टॅब, फोन जप्त
आर्थर रोड कारागृह अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. मोबाइल, टॅब जप्त करत कारवाई करण्यात आली असल्याचे आर्थर रोड कारागृह विभागाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी सांगितले.
पैशांचे व्यवहार?
कोणी हे पुरवले? यामध्ये पोलिस किंवा संबंधित रुग्णालयातील कुणाचा हात आहे का? किती दिवसांपासून मोबाइलचा वापर सुरू होता? आतापर्यंत कुणाकुणाशी संपर्क झाला? यादरम्यान कुणाशी पैशांचे व्यवहार झाले आहेत का? याबाबत पोलिस तपास करत आहेत.