सीट बदलून जवळ बसवलं, महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा अकासाच्या ‘पायलट’कडून छळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 06:19 AM2023-10-18T06:19:45+5:302023-10-18T06:20:05+5:30
बेंगळुरू-पुणे विमानातील धक्कादायक प्रकार. तीन महिन्यांची इंटर्नशीप संपवून तरुणी घरी परतत होती.
एका २० वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने बंगळुरूहून पुण्याला जाणाऱ्या ‘अकासा एअर’च्या विमानातील ऑफ-ड्युटी पायलटने तिचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विमानातील कर्मचाऱ्यांकडे आणि एअरलाइनकडे तक्रार केल्यावरही कोणतीच कारवाई न झाल्याचे तिने म्हटले.
तीन महिन्यांची इंटर्नशीप संपवून तरुणी घरी परतत होती. त्या पायलटने पहिल्यांदा सीट बदलून त्याच्याजवळच्या सीटवर बसण्यास भाग पाडले आणि नंतर मद्य देऊ केले, असे तिने सांगितले.
सुरुवातीला सामान ठेवण्याच्या बहाण्याने तो माझ्याशी बोलू लागला. ऑफ-ड्युटी पायलट असल्याचे त्याने सांगितले. थोड्यावेळाने त्याने एका फ्लाइट अटेडंटद्वारे मला मागील बाजूस जिथे कर्मचारी होते तिथे येण्याची विनंती केली. सामानाबद्दल समस्या असावी असे वाटल्यामुळे मी तिथे गेले. त्याला विचारणा केली असता त्याने मला मद्य देऊ केले, ज्याला मी नकार दिला. तो सतत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, मला अत्यंत अस्वस्थ करत होता. पुण्यात उतरल्यावरही त्याचे बेशिस्त वर्तन सुरूच होते, असे तरुणी म्हणाली.
अकासाने प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आणि सोशल मीडिया टीम तरुणीशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा केला आहे. घटनेच्या १५ दिवसांनी, सोमवारी ‘अकासा’ने पोस्टला प्रतिसाद दिला असला तरी अद्याप संपर्क साधला नसल्याचे तरुणीने म्हटले. नेटकरी या घटनेमुळे संताप व्यक्त करीत आहेत.