अरे देवा! नोकरांनीच मारला दुकानात डल्ला, १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 10:29 AM2022-04-07T10:29:44+5:302022-04-07T10:33:44+5:30
गोपाल पलोड यांचे नवीपेठेत पतंजली कंपनीची उत्पादने विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी प्रवीण राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामाला आहेत.
जळगाव : रिंगरोड येथील रहिवासी गोपाल काशिनाथ पलोड यांच्या नवीपेठेतील दुकानात नोकरांनीच डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानातून १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून, ही घटना मंगळवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दोन्ही नोकरांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाल पलोड यांचे नवीपेठेत पतंजली कंपनीची उत्पादने विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी प्रवीण राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामाला आहेत. परंतु, दोन महिन्यांपूर्वी समाधान हा कौटुंबिक कारणामुळे काम सोडून निघून गेला होता. दरम्यान, मंगळवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास पतंजली कंपनीचे अधिकारी इकबाल यांनी गोपाल पलोड यांचा मुलगा कौशल यांना फोन केला आणि तुमचे दुकान इतके उशिरापर्यंत कसे उघडे आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने आपण चंद्रपूर येथे असल्याचे सांगितले. नंतर कौशल याने वडिलांना दुकान उघडे असल्याची माहिती दिली. गोपाल पलोड यांनी लागलीच त्यांच्या पत्नीसह दुकान गाठले.
वाहनात माल भरून नोकर होता रफुचक्कर होण्याच्या तयारीत...
दरम्यान, पलोड दाम्पत्याने दुकान गाठल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दोन महिन्यांपूर्वी काम सोडून गेलेला नोकर समाधान धनगर हा दुकानातून माल चोरून चारचाकी वाहनात भरून रफुचक्कर होण्याच्या तयारीत दिसून आला. त्यावेळी पलोड यांच्या पत्नी विद्या यांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधान याने त्यांना धक्का देऊन खाली पाडले आणि तेथून पसार झाला.
दुसरा नोकर दिसला पळताना, त्याला पाठलाग करून पकडले
दुकानातील दुसरा नोकर प्रवीण राठी हासुद्धा पळताना गोपाल पलोड यांना दिसून आला. त्याचा पाठलाग करून त्यांनी त्याला पकडले. नंतर दुकानाजवळ आणून अंगझडती घेतल्यावर प्रवीण याच्याजवळ दोन टॉर्च मिळून आल्या. नंतर त्याने बनावट चावीच्या माध्यमातून समाधान व आपण दुकानात चोरी केली असल्याची कबुली दिली. पलोड यांनी लागलीच त्यास शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.