शो हॅज टू गो ऑन! ईडीला पूर्ण सहकार्य करणार- आयुक्त इक्बालसिंह चहल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 07:38 AM2023-01-16T07:38:55+5:302023-01-16T07:39:24+5:30
"ईडी कार्यालयात जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करू"
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर ईडी चौकशीची टांगती तलवार असतानाच आयुक्तांनी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत रविवारी उत्साहाने भाग घेतला. शो हॅज टू गो ऑन, सोमवारी ईडीला चौकशीत पूर्ण सहकार्य करणार, अशी ग्वाही आयुक्त चहल यांनी दिली.
कोरोना केंद्राच्या कंत्राटाबाबत माहिती देण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह सोमवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात हजर राहा, असे समन्स चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी बजावले आहे. माहीम रेती बंदर ते आझाद मैदान या २१.९७ किमी मुंबई हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी भाग घेतला होता. पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले की, मी आत्तापर्यंत सर्व मुंबई मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे, ही १८ वी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा असून मुंबई मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकांना पूर्णपणे आम्ही सहकार्य केले आहे. ईडी चौकशीबद्दल त्यांना पालिका आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले सोमवारी ईडी कार्यालयात जाणार असून त्यांना योग्य ते सहकार्य करू. त्याहून अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.