‘पीएफआय’च्या त्या पाच सदस्यांचा ATS कोठडीतील मुक्काम वाढला

By अझहर शेख | Published: October 3, 2022 08:24 PM2022-10-03T20:24:44+5:302022-10-03T20:37:24+5:30

पुण्याच्या 'जर्मन बेकरी बॉम्बस्फोटा'शी कनेक्शनचा ATS ला संशय

The stay of those five members of 'PFI' in ATS custody was extended | ‘पीएफआय’च्या त्या पाच सदस्यांचा ATS कोठडीतील मुक्काम वाढला

‘पीएफआय’च्या त्या पाच सदस्यांचा ATS कोठडीतील मुक्काम वाढला

Next

नाशिक : राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या ‘त्या’ पाच सदस्यांपैकी काहींनी चक्क फायरिंगचे देखील प्रशिक्षण घेतल्याचा संशय पथकाला आहे. तसेच संशयितांनी सातत्याने आखाती देशांत प्रवास केला असल्याचे तपासातून पुढे आले आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचविण्याचा संबंधितांचा काही कट होता का? याबाबत अधिक तपास करावयाचा असल्याने एटीएस कोठडी मिळावी, असा युक्तीवाद सरकारपक्षाकडून जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी (दि.३) करण्यात आला. न्यायालयाने सरकार पक्षाची विनंती मान्य करत संशयितांना येत्या १७ तारखेपर्यंत काेठडी दिली.

देशभरात एकाचवेळी सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेला पहाटेच्या सुमारास ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित पदाधिकाऱ्यांची धरपकड करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) आदेशानुसार दहशतवादविरोधी पथकांनी हे धाडसत्र राबविले होते.

नाशिकच्या एटीएस पथकाने मालेगावातून संशयित मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८, रा.कोंढवा, पुणे), रझी अहमद खान (३१, रा. आशोका म्युज, कोंढवा, पुणे), वसीम अझीम उर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर) या पाच सदस्यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांची कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने पथकाने त्यांना कडेकोट बंदोबस्तात जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले.

न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी एटीएसचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तीवाद केला. यावेळी मिसर यांनी एटीएसकडून करण्यात आलेल्या तपासाची प्रगती न्यायालयाला सांगितली. तसेच तपासात राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करणारे आक्षेपार्ह बाबी समोर आल्याचेही पुराव्यांसह सांगण्यात आले. यामुळे न्यायालयाने पाचही संशयितांना पुन्हा चौदा दिवसांकरिता एटीएसच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

न्यायालयातील युक्तीवादातील काही मुद्दे

पाचही संशयित हे एकमेकांच्या सतत सोशलमिडिया व फोन कॉल्सच्या माध्यमातून संपर्कात होते. त्यांच्यातील संवाद हा आक्षेपार्ह असून राष्ट्रीय सुरक्षेबाबत विचार करण्यास लावणारा आहे. पाचपैकी काहींनी सतत दुबई, सौदी अरेबिया यांसारख्या आखाती देशांचा दौरे केलेले आहेत. य दौऱ्यांत ते तेथे कोणाला भेटले? काय केले? याबाबत माहिती काढायची आहे. तसेच पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोटाच्या घटनेतील संशयितांसोबत यांच्या काही ‘कनेक्शन’ आहे का? याचाही शोध घ्यावयाचा आहे, असे सरकार पक्षाकडून ॲड. अजय मिसर यांनी सांगितले. या मुद्द्यांच्याअधारे न्यायालयाकडे एटीएस कोठडीची विनंती केली गेली. न्यायालयाने ती मान्य केली.

 

Web Title: The stay of those five members of 'PFI' in ATS custody was extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.