मानलेल्या भावानेच दगा दिला; मैत्रिणीसोबत बोलताना अचानक चाकूनं वार केला, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 08:29 AM2022-03-07T08:29:47+5:302022-03-07T08:30:29+5:30
पहिल्या मजल्यावर पायलचा खासगी क्लास आहे. या क्लासमध्ये पायल रविवारी सकाळी नऊ वाजता आली. दोन वर्ग मैत्रिणींसमवेत ती बोलत असतानाच तिथं निखिल आला.
सातारा : त्याचं घरात येणं-जाणं असायचं. पायलच्या चुलत भावाचा तो मित्र असल्याने घरातले सगळेचजण त्याला दादा म्हणूनच हाक मारायचे, तर पायल गुरूभाऊ मानायची. एवढेच नव्हे, तर पायल काॅलेजला जाताना कधी कधी तो तिला दुचाकीवरून सोडायलाही जायचा. असे असताना अचानक त्याने पायलचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याने पायलच्या घरातल्यांना मानसिक धक्का बसलाय.
कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील पायल साळुंखे (वय १७) या महाविद्यालयीन युवतीचा खून झाल्यानंतर या घटनेचे अनेक कंगोरे समोर आले. पायल गावाच्या बाहेर असलेल्या वस्तीवर राहत होती, तर निखिल हा पिंपोडे गावात राहत आहे. पायलचा चुलत भाऊ आणि निखिल चांगले मित्र. त्यामुळे निखिलचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं. पायलच्या घरापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर काॅलेज आहे. काॅलेजला कधी उशीर झालाच तर निखिल म्हणे तिला दुचाकीवरून सोडायलाही जायचा. त्यामुळे पायलनं म्हणे त्याला गुरूभाऊ मानलं होतं. निखिल असं काय करेल, हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पायलचा जीवघेण्याइतकं मोठं कारण काय होतं, हे आता पोलिसांच्या तपासात समोर येईलच; पण पायलच्या घरातल्यांनी निखिलवर टाकलेल्या विश्वासामुळे मानलेल्या नात्यांचा अशा घटनांमुळे समाजाचा विश्वासच उडू लागलाय हे मात्र निश्चित.
दोन मैत्रिणींसमोरच चाकूचे वार
पहिल्या मजल्यावर पायलचा खासगी क्लास आहे. या क्लासमध्ये पायल रविवारी सकाळी नऊ वाजता आली. दोन वर्ग मैत्रिणींसमवेत ती बोलत असतानाच तिथं निखिल आला. तिच्याशी काहीही न बोलता त्याने अचानक तिच्या पोटात सपासप चाकूने वार केले. हे पाहून तिच्या दोन वर्ग मैत्रिणी किंचाळल्या. त्या दोन मुली खाली ओरडत आल्या. तेव्हा आजूबाजूच्या दुकानदारांना याची माहिती मिळाली. तोपर्यंत निखिल तेथून पसार झाला. पायल रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
पायलनं अखेर शिक्षकांनाच सांगितलं..
पायलच्या खासगी क्लासच्या शिक्षकांची आई पिंपोडेतीलच एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. आईला पाहण्यासाठी शिक्षक त्या रुग्णालयात गेले होते, तर इकडे त्यांच्या क्लासमध्ये पायलवर वार झाले. योगायोगाने पायललाही नागरिकांनी त्याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तेव्हा पायल थोडीफार शुद्धीवर होती. तिच्या शिक्षकांना आणि डाॅक्टरांना तिने निखिलने मारले असल्याचे सांगितले; पण तिची प्रकृती बिघडू लागल्याने तिला साताऱ्याला नेण्यात आले. यावेळी ती बेशुद्ध पडली. साताऱ्यात पोहोचल्यानंतर तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मात्र, शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच पायलने या जगाचा निरोप घेतला. परिणामी मृत्यूपूर्व जबाब तिचा अखेर राहिलाच.