भाडेकरूची माहिती पोलिसांपासून लपविली! खेरवाडीत घर मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:55 AM2023-05-25T11:55:47+5:302023-05-25T11:55:57+5:30
प्रत्येक भाडेकरूची माहिती घर मालकाने संबंधित पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाडोत्रीची माहिती स्थानिक पोलिसांपासून लपवून ठेवल्याप्रकरणी घर मालकाच्या विरोधात खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवाद विरोधी कक्षाने हा गुन्हा नोंद केला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
खेरवाडी पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकात अविनाश भोसले (३४) हे कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ मे रोजी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव आणि त्यांचे पथक भाडेकरू तपासणीसाठी गस्त घालताना, वांद्रे पूर्वच्या महाराष्ट्रनगरमध्ये असलेल्या रिहाब इमारतीच्या फ्लॅट क्रमांक ४०१ मध्ये संजय परदेसी (४७) हे भाडेकरू त्यांना सापडले. पोलिसांनी परदेसीकडे चौकशी केली असता, ते घर त्यांनी भास्कर कैकाडी (४२) यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. तेव्हा पोलिसांनी घराचे ॲग्रीमेंट, तसेच भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला कळविल्याचे कागदपत्र परदेसीकडे मागितले.
मात्र, भाडेकरूंची माहिती पोलिसांना दिली नसल्याने, तशी कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याचे परदेसींनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार, या प्रकरणी कैकाडी यांच्या विरोधात खेरवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी ४ मी रोजी काढलेल्या आदेशानुसार, प्रत्येक भाडेकरूची माहिती घर मालकाने संबंधित पोलिस ठाण्यात देणे बंधनकारक असल्याचे जाधव यांनी त्यांना समजून सांगितले. या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.