चोरट्यांची दहशत... हुडकेश्वरमध्ये एकाच रात्री वस्तीतील दोन घरे फोडली!
By योगेश पांडे | Published: May 4, 2023 05:07 PM2023-05-04T17:07:31+5:302023-05-04T17:07:43+5:30
शिक्षक कॉलनी येतील प्लॉट क्रमांक १९ येथे संजय पांडुरंग टोनपे (४३) हे राहतात. १ मे रोजी ते सकाळी ९ वाजता घराला कुलूप लावून उमरेड येथे लग्नासाठी गेले.
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकाच वस्तीतील दोन ठिकाणी घरफोडी झाली. दोन्ही घरांतील सदस्य बाहेरगावी गेले होते व तीच संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शिक्षक कॉलनी येतील प्लॉट क्रमांक १९ येथे संजय पांडुरंग टोनपे (४३) हे राहतात. १ मे रोजी ते सकाळी ९ वाजता घराला कुलूप लावून उमरेड येथे लग्नासाठी गेले. यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
लोखंडी आलमारीतून सोन्याचे दागिने व रोख ५ हजार असे एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्यांनी प्लॉट क्रमांक २९ येथील घरी वळविला. तेथील घरमालक राजकुमार संपत गेडाम हे त्यांच्या घराला कुलूप लावून भिवापूरला गेले होते. चोरट्यांनी तेथीलदेखील कुलूप तोडले व बेडरूममधील लोखंडी कपाटातून सोनेचांदीचे दागिने व रोख १० हजार रुपये असा ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
टोनपे यांच्या तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उन्हाळा सुरू झाल्याने लोक बाहेरगावी जातात व याचाच फायदा चोरटे उचलतात. विशेषत: हुडकेश्वरसारख्या शहराच्या सीमेवरील भागांमध्ये चोरट्यांची जास्त दहशत आहे. या दोन्ही प्रकरणांत रेकीनंतरच चोरट्यांनी घरफोडी केल्याचा पोलिसांना संशय आहे.