वृद्धेच्या घरात लाखोंच्या दागिन्यांची चोरी, दाम्पत्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:36 PM2023-06-18T12:36:54+5:302023-06-18T12:52:59+5:30
तक्रारदार लीना मटानी (७९) या कफ परेडच्या कासाब्लांका इमारतीत एकट्याच राहतात.
मुंबई : कफ परेड परिसरात एकट्या राहणाऱ्या वृद्धेच्या घरातून लाखोंचे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी तिने तिच्या घरी काम करणाऱ्या दोन मोलकरणींवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, रूबिका, तिचा पती रवी यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार लीना मटानी (७९) या कफ परेडच्या कासाब्लांका इमारतीत एकट्याच राहतात. त्यांच्या पतीचे १० जून २०२० रोजी निधन झाले. त्यांच्याकडे घरकामासाठी रूबिका (२२) नावाची महिला जानेवारी, २०२३ मध्ये येऊ लागली. मात्र, नंतर ती गरोदर राहिल्याने तिने २६ मे रोजी तब्येतीचे कारण देत नोकरी सोडली. त्यानंतर तिने मयूरी (३५) या महिलेला घरकामासाठी ठेवले.
मयूरीने कामाला सुरुवात केली; त्यानंतर ३० मे रोजी तब्येत ठीक नसल्याने ती कामावर येणार नसल्याचे मटानी यांना कळवले. तेव्हा मटानी यांनी तिला दोन दिवस आराम करायला सांगितले. पुढे तिने ३ ते ६ जूनपर्यंत वेळेवर काम केले आणि ती निघून गेली. मात्र, ७ जून रोजी ती उशिरा कामावर आली. त्यामुळे मटानी यांनी तिला त्याबाबत विचारणा केली. तेव्हा तिने अन्य कुठेतरी जेवण आणि नाश्ता बनविण्याचे काम घेतले असल्याने तसेच तिच्या मालकाच्या घरी पाहुणे असल्याने उद्यापासून फक्त भांडी घासण्याचे काम करणार असल्याचे मटानी यांना म्हणाली.
मटानी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरात असलेल्या मास्टर बेडरूममध्ये त्यांचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असून, त्यांचा वापर त्या करीत नाहीत.
त्या वस्तू ठेवलेल्या कपाटाची चावीही त्यांच्याकडे आहे. त्या कपाटातील जवळपास १७ लाख १५ हजारांचे दागिने त्यात नसल्याने त्यांनी बँकेच्या लॉकरमध्ये जाऊन तपासले. मात्र, तिथेही दागिने नव्हते.
त्यावरून त्यांना रूबिका किंवा मयूरी यांनी ही चोरी केली असल्याचा संशय आहे.