देवाची दया नव्हे, तर चोराची माया; महिलेच्या 'गुगल पे'वर अचानक आले ६०,०००, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 09:49 AM2022-02-15T09:49:55+5:302022-02-15T09:51:34+5:30
वचपा काढण्यासाठी महिलेच्या खात्यात रक्कम केली ‘गुगल पे’
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : बँक खात्यात अचानक ६० हजार रुपये आल्याने घाटकोपरमधील महिला हुरळून गेली. देवाची आपल्यावर दया झाली असे काहीसे वाटल्याने त्यातील काही पैसे तिने खर्चही केले. मात्र दुसऱ्याच दिवशी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तिचे दार ठोठावले आणि तो चोरीचा पैसा असल्याचे तिला समजले. ते पैसे एका चोराने वचपा काढण्यासाठी चोरीच्या मोबाइलवरून गुगल पे केले होते. मात्र पोलिसांनी तपास करत खरा प्रकार उघड करत आरोपीला अटक केली.
साहिल सईद कुरेशी (२२) असे अटक आरोपीचे नाव असून तो घाटकोपरमधील नित्यानंद नगरमध्ये राहतो. त्याच्या मित्राच्या घरी महिनाभरापूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणात पीडितेने तिघांवर आरोप केला. यात कुरेशीचा समावेश होता. त्यानुसार अभिलेखावरील आरोपी कुरेशीला चिरागनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. पण काहीच निष्पन्न न झाल्याने त्याला सोडून दिले. याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. दरम्यान घाटकोपर रेल्वे स्थानकावर तो फिरत असताना सावला (२७) नावाच्या व्यक्तीचा मोबाइल त्याने चोरला. सावलाने जेव्हा त्याने कुरेशीला फोन परत करण्याची विनंती केली. तेव्हा त्याने फोन तुझाच आहे यावर कसा विश्वास ठेवू? तू मला मोबाइलचा पिन दे म्हणजे ते सिद्ध होईल असे सांगितले. तसेच मोबाइल परत देण्यासाठी सावलाना ठाण्याला भेट असे सांगितले.
सावला यांनी विश्वास ठेवत त्याला पिन सांगितला आणि कुरेशीने त्यांच्या मोबाइलमधून ६४,२०० रुपये हे महिलेच्या अकाउंटवर पाठवले. त्यामुळे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. देवाच्या कृपेने खात्यात पैसे आले असे वाटून त्यातले साडेपाच हजार रुपये तिने खर्च केल्याचे सांगितले. कोणी मुद्दाम पैसे पाठवत तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करेल असे वाटते का? अशी विचारणा केल्यावर तिने कुरेशीचे नाव घेत त्यांना चिरागनगर पोलीस ठाण्यातील प्रकार सांगितला.
...आणि खरा आरोपी गजाआड
कुरेशीने पोलिसांना चकवण्यासाठी स्वतःचे मोबाइल सिम वापरले नाही. मात्र सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावित, सहायक पोलीस फौजदार डी. बी. सय्यद आणि पथकाने योग्य तपास करत खऱ्या आरोपीला गजाआड केले. तर महिलेला याप्रकरणी साक्षीदार करण्यात आले आहे.