चोराने गिळली सोनसाखळी, दवाख्यान्यात नेऊन बाहेर काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:00 AM2022-09-19T09:00:07+5:302022-09-19T09:57:14+5:30
सायन रुग्णालयात एण्डोस्कोपीने काढली बाहेर
गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : वांद्रे येथील माउंट मेरी जत्रेत शनिवारी तीन वर्षांच्या मुलीची तीन ग्रॅम वजनाची सोनसाखळी एका जोडप्याने चोरली. पोलिसांपासून लपविण्याच्या भानगडीत त्यातील एकाने चक्क ती गिळून टाकली. मात्र, वांद्रे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि सायन रुग्णालयात दाखल करत ती सोनसाखळी त्यांनी हस्तगत केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
राकेश माळी (२३) आणि सीता माळी (२३) असे आरोपी जोडप्याचे नाव असून, दोघेही राजस्थानमधील दूधवाला गावचे रहिवासी आहेत. माउंट मेरी जत्रेत लोकांना टार्गेट करून सोन्याच्या चेन, पाकीट आणि मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी हे जोडपे मुंबईत आले. शनिवारी दुपारी फिल्वी नारकर या नालासोपाराच्या रहिवासी त्यांची ३ वर्षांची मुलगी तानियासोबत माउंट मेरीला आल्या होत्या. चर्चच्या बाहेर सीताने तानियाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला आणि तिचा पती राकेशला साखळी दिली. ज्याने ती तोंडात ठेवून नंतर गिळली.
फिल्वी यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक सुनील कदम आणि एटीसी कर्मचारी यांनी आरोपींना पकडले. त्यांच्या झडतीत सोनसाखळी सापडली नाही. चौकशीत आरोपीने ती गिळल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच पोलिसांनी माळीला सायन रुग्णालयात दाखल केले .
रविवारी डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करून माळीच्या पोटातली सोनसाखळी बाहेर काढली. यानंतर आरोपी राकेश माळी आणि त्याची पत्नी सीता माळी यांना रविवारी अटक करण्यात आली.