सराईत चोरटयाला पाठलाग करून पकडले; सात गुन्हे उघडकीस
By प्रशांत माने | Published: September 12, 2022 05:36 PM2022-09-12T17:36:08+5:302022-09-12T17:37:48+5:30
कल्याण - जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत चोरटयाला कल्याण तालुका पोलिसांनी रविवारी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीत सात ...
कल्याण - जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत चोरटयाला कल्याण तालुका पोलिसांनी रविवारी पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्याच्या चौकशीत सात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून त्याचा चेन स्नॅचिंग, मोबाईल आणि दुचाकी चोरीच्या गुन्हयात सक्रिय सहभाग असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडून २ लाख ५३ हजारांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कल्याण तालुका पोलीस ठाण्यात (टिटवाळा/ठाणो ग्रामीण) दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयाचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप शिंगटे, पोलीस नाईक दर्शन सावळे, पोलीस हवालदार योगेश वाघेरे यांच्यामार्फत सुरू होता. रविवारी सकाळी संबंधित पथक गस्त घालित असताना फळेगाव रोडवरून वासिंद रोडकडे एकजण दुचाकीवर भरधाव वेगात जाताना दिसून आला. त्याला दुचाकी थांबविण्यासाठी इशारा केला असता तो यु टर्न घेत पळून जाऊ लागला.
पोलिसांनी संशयावरून त्याचा पाठलाग केला आणि त्याला शिताफीने पकडले. करण बिरबल राजभर (वय १९) रा. अटाळी, आंबिवली. असे अटक केलेल्याचे नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरिक्षक शिंगटे यांनी दिली. त्याच्यावर अंबरनाथ पोलीस ठाण्यात २, खडकपाडा पोलिस ठाण्यात ३ तर कल्याण तालुका पोलrस ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. त्याने गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. त्याने साथीदार कासीम इराणी उर्फ तलफ याच्यासह गंभीर गुन्हे केले आहेत. कासीमचा शोध सुरू आहे. दरम्यान कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने करणला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.