पाटणसावंगीत थरार; दरोडेखोरांचा बेछुट गोळीबार, सराफाला लुटले, ३० लाख रुपयांचा ऐवज पळविला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:36 AM2023-05-25T05:36:34+5:302023-05-25T05:36:47+5:30
तिन्ही दराेडेखाेर पायी आले हाेते. नदीच्या काठी अथवा परिसरात काेणतेही वाहन आढळून आले नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (पाटणसावंगी) : सराफा व्यापाऱ्याने साेन्या-चांदीचे दागिने व राेख रक्कम बॅगेत ठेवून ती बॅग दुचाकीवर ठेवताच तिघांपैकी एका दराेडेखाेराने ती बॅग पळविली. नागरिकांनी त्याचा पाठलाग करताच दराेडेखाेरांनी नागरिकांच्या दिशेने गाेळीबार केला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना बुधवारी (दि. २४) रात्री ९:४५ ते १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, त्या बॅगेत एकूण ३० लाख रुपयांचा ऐवज असल्याची माहिती व्यापाऱ्याने दिली.
किशाेर वामनराव मर्जिवे (रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) यांचे गावातच किशाेर वामनराव मर्जिवे नामक साेन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. त्यांनी बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानातील दागिने आणि राेख रक्कम बॅगेत ठेवली व दुकान बंद करण्यापूर्वी ती बॅग दुचाकीवर ठेवली. त्याचवेळी एका दराेडेखाेराने ती बॅग नदीच्या दिशेने पळविली. दराेडेखाेराचा एक साथीदार नदीच्या काठावर, तर दुसरा पात्रात उभा हाेता.
किशाेर मर्जिवे यांनी आरडाओरड करताच नागरिकांनी दराेडेखाेरांचा पाठलाग केला. मात्र, दराेडेखाेरांनी नागरिकांच्या दिशेने गाेळीबार करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्या बॅगमध्ये साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा एकूण ३० लाख रुपयांचा ऐवज असल्याची माहिती किशाेर मर्जिवे यांनी पाेलिसांना दिली.
माहिती मिळताच सावनेर पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. पाेलिस अधीक्षक विशाल आनंद, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची पाहणी, घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पाटणसावंगी येथे तळ ठाेकून हाेते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.
कुसुंबी-इटनगाेटीच्या दिशेने पळाले
तिन्ही दराेडेखाेर पायी आले हाेते. नदीच्या काठी अथवा परिसरात काेणतेही वाहन आढळून आले नाही. गाेळीबार केल्यानंतर तिन्ही दराेडेखाेर कुसुंबी-इटनगाेटी मार्गाने पळून गेले. संपूर्ण घटनाक्रम विचारात घेता ही घटना पूर्वनियाेजित असून, दराेडेखाेर किशाेर मर्जिवे यांच्यावर पाळत ठेवत असावे. शिवाय, दाेघे अंधारात वेगवेगळ्या ठिकाणी उभे हाेते. दराेडेखाेरांनी त्यांचे वाहन नदीच्या पलीकडे ठेवले असावे, अशी शक्यताही काहींनी व्यक्त केली.