टास्क फ्रॉड प्रकरणातील त्रिकुटाला हरियाणातून बेड्या, दीड लाखांचा घातला होता गंडा
By मनीषा म्हात्रे | Published: October 23, 2023 08:50 PM2023-10-23T20:50:41+5:302023-10-23T20:51:09+5:30
फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच गाठले होते कांजूरमार्ग पोलीस ठाणे
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: टास्क फ्रॉडच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला कांजूरमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका महिलेला या आरोपींनी दीड लाख रुपयांना गंडा घातला असून पोलीस त्यांच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार महिला कांजूरमार्ग परिसरात राहण्यास आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी त्यांनी नोकरीसाठी एका सोशल मिडीयावर एक अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना एका इसमाने फोन करून नोकरीची ऑफर दिली. मात्र याच वेळी आरोपीने महिलेला वेगवेगळी कारणे देत, तिच्याकडून १ लाख ६५ हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर महिलेने नोकरीसाठी अनेकदा या आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नॉट रिचेबल झाले.
आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच त्यांनी, याबाबत कांजूरमार्ग पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसानी तत्काळ यामध्ये गुन्हा दाखल नोंदवत तपास सुरू केला. महिलेने पाठवलेल्या बँक खात्याच्या माहितीवरून पोलिसांनी बोरिवली परिसरातून सुनीलकुमार दुबे (२३) याला ताब्यात घेतले. तपासात त्याने हा गुन्हा हरियाणा येथे राहणाऱ्या मुनीब कुरेशी ३७) आणि रईस रजांडे (३३) या दोघांच्या मदतीने केल्याची कबुली देताच पोलिसांनी त्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.