ज्वेलर्स दुकान फोडून सव्वातीन कोटींचे सोन्याचे दागिने चोरणारे त्रिकुट जेरबंद!
By अजित मांडके | Published: August 22, 2023 04:10 PM2023-08-22T16:10:10+5:302023-08-22T16:10:31+5:30
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरबाजारात गर्दीच्या ठिकाणी मोठी आणि धाडसी घरफोडी झाल्याने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ठाणे : उल्हासनगर येथील बहुचर्चित विजयलक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान फोडून सुमारे सव्वातीन कोटींचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सराईत माधव चुन्नालाल गिरी, दिनेश उर्फ सागर चंद्र रावल आणि दीपक रामसिंग भंडारी या त्रिकुटाला ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता शोध पथकाने नेपाळ येथून जेरबंद केले. तसेच त्यांच्याकडून या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ५५० ग्रॅम वजनाचे ३३ लाख रुपये किंमतीच सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. तसेच त्यांच्यावर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्यावर यापूर्वी मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
उल्हासनगर झवेरी बाजार येथील विजयलक्ष्मी ज्वेलर्स दुकान २७ जून रोजी फोडून त्या दुकानातील तब्बल ३ कोटी २० लाख किमतीचे ०६ किलो सोन्याचे दागिने अनोळखी चोरट्यांनी चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाणे घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. भरबाजारात गर्दीच्या ठिकाणी मोठी आणि धाडसी घरफोडी झाल्याने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक पोलीस आणि ठाणे गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके बनवली होती. याचदरम्यान चोरटे हे नेपाळ मधील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आले.
गुन्हा दाखल झाल्यापासून चोरटे प्रयत्न करून सुद्धा मिळून येत नव्हते, त्यामुळे हा गुन्हा उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यातच गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखा पथकाने त्याबाबत समांतर तपास करून त्या चोरट्यांबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे आणि अत्यंत कौशल्याने तपास करून त्यांचा शोध लखनौ, बनारस, नेपाळ- भारत सीमावर्ती भागात घेतला आणि ह्या त्रिकुटाला अटक केली. चौकशी त्यांनी त्या गुन्ह्याची कबुल देत, त्यांच्या कडून ५५० ग्राम वजनाचे ३३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
या गुन्ह्याचा पुढे तपास गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहेत. ही कारवाई मालमत्ता गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक महेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील प्रधान, पोलीस अंमलदार संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे, राजाराम शेगर, रूपवंत शिंदे, किशोर भामरे, नगराज रोकडे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे, गीताली पाटील यांनी केली.